होड्यांच्या शर्यतीमध्ये कुलाबा कोळीवाड्याचा जलवा
By Admin | Updated: March 6, 2017 04:57 IST2017-03-06T04:57:52+5:302017-03-06T04:57:52+5:30
मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांच्या विशेष शर्यतीमुळे पी-वन पॉवरबोट रेसिंगची रंगत वाढली

होड्यांच्या शर्यतीमध्ये कुलाबा कोळीवाड्याचा जलवा
रोहित नाईक,
मुंबई- मुंबईचे भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोळी बांधवांच्या विशेष शर्यतीमुळे पी-वन पॉवरबोट रेसिंगची रंगत वाढली होती. पारंपारिक कोळी होड्यांच्या या शर्यतीमध्ये मुंबईतील निवडक ८ कोळीवाड्यांचा सहभाग लाभला. यामध्ये कुलाबा कोळीवाड्याने वर्चस्व राखताना एक लाख रुपयांच्या बक्षिसावर कब्जा करुन ‘दर्याचा राजा’चा मान मिळवला.
जोरदार वारा आणि वेगवान लाटा यांना सामोरे जात स्पर्धकांनी आपआपल्या होड्या वेगात वल्हवण्याचे आव्हान पेलले. विशेष म्हणजे मुंबईकरांनी जोरदार प्रोत्साहन देत या ‘दर्याच्या राजांचा’ उत्साह आणखी वाढवला. दोन दिवस झालेल्या या विशेष शर्यतीमध्ये कुलाबा संघाने चमकदार कामगिरी केली. वर्सोवा आणि हाजी अली या कोळीवाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. या दोन्ही संघांना अनुक्रमे ६० आणि ३० हजार रुपयांवर समाधान मानावे लागले.
कोळीवाड्यांच्या शर्यती झाल्यानंतर मुंबईकरांनी पॉवरबोट्सच्या तुफान वेगाचा थरार अनुभवला. दखल घेण्याची बाब
म्हणजे, पहिल्यांदाच भारतात आयोजित होणाऱ्या या शर्यतीचा प्रत्यक्षपणे अनुभव घेण्यासाठी मुंबईकरांनी रविवारची सुट्टी
मरिन ड्राइव्हच्या किनारी घालवली. यामुळे दुपारच्या भर उन्हातही मुंबईची शान असलेल्या ‘क्वीन नेकलेस’ किनारा तुफान गर्दीने फुलला होता.
अनेकांची पॉवरबोट्सचा थरार आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबध्द करण्यासाठी चढाओढ लागली होती. त्याचवेळी, पॉवरबोट्स जवळ आल्यानंतर जल्लोष करताना मुंबईकरांनी स्पर्धकांचा उत्साह देखील वाढवला. वेगाचा हा थरार अनुभवण्यासाठी आलेल्या मुंबईकरांना सुर्याचा तडाखाही रोखू शकला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
>‘दृष्टी’चा जागतिक विक्रम
मुंबईत झालेल्या पी-वन पॉवरबोट रेसिंगच्या आयोजनाच्या निमित्ताने दृष्टी संस्थेने जागतिक विक्रमाची नोंद केली.या शर्यतीसाठी दृष्टी संस्थेने ५.२ किमी अंतराचा शर्यत मार्ग तयार करताना तब्बल ५ हजार ७०० तरंगते फुगे समुद्रामध्ये मांडले. विशेष म्हणजे यासह सर्वाधिक तरंगत्या फुग्यांच्या सहाय्याने समुद्रामध्ये शर्यतीचा मार्ग तयार करणारी पहिली संस्था म्हणून दृष्टीने गिनिज बुकमध्ये विश्वविक्रम नोंदवला.