मुंबईच्या महापौरांसाठी सेनेची रंगीत तालीम
By Admin | Updated: March 1, 2017 03:29 IST2017-03-01T03:29:23+5:302017-03-01T03:29:23+5:30
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपामध्ये बेबनाव दिसणार नाही

मुंबईच्या महापौरांसाठी सेनेची रंगीत तालीम
प्रशांत माने,
कल्याण- मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपामध्ये बेबनाव दिसणार नाही, असे संकेत मंगळवारी केडीएमसीच्या परिवहन सदस्यपदाच्या निवडणुकीने दिले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाचा सदस्य निवडून येण्याकरिता आपल्याकडील अतिरिक्त मते दिली. याखेरीज मनसेच्या पडलेल्या उमेदवारालाही आपली अतिरिक्त मते देऊ केली.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ तर भाजपाचे ८२ नगरसेवक विजयी झाले. अपक्षांचे पाठबळ लाभल्याने भाजपाने ८५ सदस्यबळाचा दावा केला. त्यानंतर शिवसेनेने दोन बंडखोरांना पक्षात प्रवेश देऊन संख्याबळ ८६ असल्याचा दावा केला. मुंबईत शिवसेनेचाच महापौर बसवण्याकरिता मनसेच्या ७ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ सदस्यांचा पाठिंबा शिवसेनेला हवा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर होऊ देणार नाही, असे सांगत शिवसेनेचा महापौर बसेल, असे संकेत दिले. मनसेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिवसेनेला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ८६ नगरसेवकांबरोबर राष्ट्रवादी व मनसेच्या १६ नगरसेवकांनी शिवसेनेचाच महापौर बसवण्याला पाठिंबा दिला तर शिवसेनेचा दावा मजबूत होतो. त्यामुळे भाजपा आपला महापौर बसवण्याचा आग्रह सोडून शिवसेनेचा महापौर बसवण्यास राजी होते. त्यानंतर राष्ट्रवादी व मनसे यांचा थेट पाठिंबा न घेता शिवसेनेचा महापौर विराजमान होऊ शकतो.
येत्या काही दिवसांत होणाऱ्या या राजकीय घडामोडींच्या पाऊलखुणा मंगळवारी केडीएमसीत दिसल्या. परिवहन समितीवर भाजपाचा तिसरा उमेदवार धाडण्याकरिता त्या पक्षाला शिवसेनेच्या तीन मतांची गरज होती. ही मते शिवसेनेने दिली. शिवसेना आणि मनसे हे एकमेकांना कधी टाळी देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील ठाकरेबंधूंचे चाहते डोळे लावून बसले असताना शिवसेनेने मनसेच्या पराभूत होणाऱ्या उमेदवाराला चक्क चार मते दिली. भाजपा व मनसेला शिवसेनेने केलेली ही मदत मुंबईत महापौर बसवण्याकरिता केलेली मशागत आहे, असे बोलले जाते.
परिवहन समितीवर भाजपाचा तिसऱ्या सदस्याची वर्णी शिवसेनेमुळे लागलीच. मात्र ज्या मनसेकडे केवळ ६० मते असताना त्यांचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई यांना ८४ मते मिळाली आहेत. प्रभुदेसाई यांना मिळालेली अतिरिक्त २४ मते ही शिवसेना आणि त्यांच्या अन्य सहयोगी पक्षाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी भाजपाला तर चार नगरसेवकांनी मनसेला मतदान केले.
लोकसभा निवडणुकीत ताणलेल्या संबंधानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यातील संबंध सुधारत असल्याचे हे प्रतिक असून इतरत्र बदलती समीकरण पाहता या दोघांमधील अंतर कमी होत असल्याची देखील चर्चा आहे.
>पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेने भाजपाला सहकार्य केले. मुंबईत महापौर बसवण्याकरिता काम करणाऱ्या टीममध्ये शिंदे यांचा समावेश आहे.