मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाच्या शुल्कात सुमारे ५०० ते हजार ते दोन हजारांपर्यंत वाढ करण्यात येईल. विद्यापीठाच्या सेवा हायटेक होत असल्याने शुल्कात वाढ करणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर शुल्क वाढीचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.यंदापासून विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे आॅनलाइन अॅसेसमेंटच्या माध्यमातून होईल. त्यामुळे तपासणीचा खर्च वाढेल. म्हणून परीक्षा फी वाढविण्याचा निर्णय मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. ही शुल्क वाढ सर्वच अभ्यासक्रमांसाठी आहे. ज्या अभ्यासक्रमांसाठी सध्या ६५० रुपये शुल्क होते ते आता एक हजारापर्यंत आकारण्यात येईल. या निर्णयानुसार बीए, बीकॉम, बीएसस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमांचे ५०० ते एक हजार शुल्क आता दोन हजार ते तीन हजारांवर जाईल. यामुळे पदवी, पदव्युत्तर, एमफील, पीएचडी अशा सर्व अभ्यासक्रमांचीही फीवाढ होईल. परीक्षा प्रक्रियेतील खर्च आणि त्या संबंधित घटकांना देण्यात येणारे मानधन यासंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती. तिने मानधन वाढीचा प्रस्ताव दिला. त्यावर नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा करून मानधनात वाढ व परीक्षा शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाने परीक्षा शुल्क वाढले नव्हते. परीक्षा प्रक्रियेचा खर्च दरवर्षी वाढत असल्याने हा निर्णय घेतला आला. एक्झाम सुपरवायझर, पेपर तपासणीसांचे मानधन वाढवल्याने निकाल वेळेत लागण्यास मदत होईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए.खान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
महाविद्यालयांच्या शुल्कात होणार वाढ!
By admin | Updated: April 19, 2017 03:14 IST