रुग्णांना संपाचा फटका

By Admin | Updated: August 27, 2014 00:56 IST2014-08-27T00:56:57+5:302014-08-27T00:56:57+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका रुग्णांच्या जिव्हारी बसत आहे. आज मंगळवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील रुग्णांची

Collapse of patients | रुग्णांना संपाचा फटका

रुग्णांना संपाचा फटका

दोन दिवसातील मृत्यूसंख्या १६ वर : मेयोतील डॉक्टरही संपात
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका रुग्णांच्या जिव्हारी बसत आहे. आज मंगळवारी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसातील रुग्णांची मृत्यूसंख्या १६ वर पोहचली आहे. याशिवाय बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी येणारी रुग्णसंख्याही रोडावली आहे. आज सायंकाळी ‘मार्ड’चे पदाधिकारी व प्रशासनाची बैठक झाली. परंतु, तोडगा न निघाल्याने डॉक्टरांचा संप कायम होता. या संपात मंगळवार रात्रीपासून मेयोचे तर बुधवारपासून यवतमाळ मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर संपात सहभागी होणार आहे. यामुळे संप चिघळण्याची स्थिती आहे.
रविवारी रात्री, रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळाटाळ केल्यावरून रुग्णाच्या नातेवाईकांनी हुज्जत घालून डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांनी एकमेकांविरोधात तक्रार केल्याने पोलिसांनी रुग्णाचे नातेवाईक व पाच डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. डॉक्टरला मारहाण झाल्याचा ‘इश्यू’ बनवत डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने रविवारच्या मध्यरात्री २ वाजतापासून संप पुकारला. परिणामी, सोमवारी व मंगळवारी रुग्णांचे अक्षरश: हाल झाले.
संप मागे घेण्यासाठी प्रशासनासोबत सोमवारी तीनदा बैठकी झाल्या. पण, तोडगा निघाला नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली, तर अनेक शस्त्रक्रि या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आजही मेडिकल प्रशासन व मार्ड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत मेडिकल प्रशासनाने स्वस्तरावरील मागण्या मंजूर करून संप मागे घेण्याची विनंती केली. पण, डॉक्टर मानायलाच तयार नसल्याने रात्री उशिरापर्यंत संप कायम होता. मेडिकलमधील जवळपास ३०० च्यावर डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांच्या मृत्यूसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, उपचारार्थ भरती रुग्णांचा रक्तदाब चांगलाच वाढला आहे. (प्रतिनिधी)
...तर डॉक्टरांवर कारवाई!
या घटनेनंतर डॉक्टर व नातेवाईकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. घटनेला नातेवाईकांसह डॉक्टरही तेवढेच जबाबदार असल्याने प्रकरण वाढण्याची चिन्हे आहेत. कारण, डॉक्टरांनी एका निवृत्त सैनिकाला चोप दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवृत्त सैनिक न्यायालयात गेल्यास प्रकरणाला गंभीर वळण मिळू शकते. आज रात्रीपर्यंत डॉक्टरांनी संप मागे घेऊन उद्यापर्यंत कामावर न परतल्यास डॉक्टरांवर वसतिगृहातील खोली रिकामी करण्यासह इतर कारवाईची कुऱ्हाड कोसळू शकते, अशी शक्यता मेडिकलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संप मागे न घेतल्यास कारवाई करण्याचे संकेत दिल्याची माहिती आहे.
ईसीजी कक्ष अपघात विभागात जाणार
संपाला कारणीभूत ठरलेले ‘ईसीजी’च आता अपघात विभागात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अपघात विभागातच ईसीजीपासून, एक्स-रे व सोनोग्राफीची सोय असणे आवश्यक आहे. परंतु विविध कारणांमुळे या सोयी अपघात विभागापासून बऱ्याच लांब अंतरावर आहे. यामुळे आजाराचे निदान होऊन तत्काळ उपचार करण्यास उशीर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Collapse of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.