नागपूर - एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय फडणवीसांकडून बदलले जात आहेत. त्याशिवाय शिवसेना नेत्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या जाहीर सभेत खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी रेषा छोटी करण्यापेक्षा आपली रेषा मोठी करण्याचा विरोधकांनी प्रयत्न करावा. माझ्यात आणि देवेंद्रजीमध्ये कोणतेही कोल्ड वॉर नसून राज्याला पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र करतोय. त्यामुळे कुणी कितीही ब्रेकिंग न्यूज केल्या तरीही हा फेव्हिकॉल का मजबूत जोड असल्याचं त्यांनी म्हटलं.
तसेच कोणत्याही पदाची लालसा न बाळगता काम करणे, कुणाशीही कोल्ड वॉर न करता राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध असून जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या अभूतपूर्व यशाची परतफेड विकासकामे पूर्ण करून करू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांची महालाट आली आणि त्यात भलेभले वाहून गेले. काहीजण म्हणाले होते, तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही. पण विधानसभेतील भाषणात २०० हून अधिक जागा निवडून आणू, अशी मी घोषणा केली होती. निवडणुकीत मी आणि देंवेंद्र फडणवीस यांनी मिळून महायुतीच्या २३२ जागा निवडून आणल्या. काही जण स्वतःला 'धक्कापुरुष' म्हणवून घेण्यात आंनदी आहेत पण लोकं आपल्याला सोडून का जात आहेत याचे आत्मचिंतन मात्र ते करायला तयार नाहीत. त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही 'जोर का धक्का' देऊन कायमचे घरी बसवावे असं आवाहन करत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.
पदासाठी, खुर्चीसाठी कासावीस नाही
सत्ता येते आणि जाते, पदं येतात आणि जातात, पुन्हा पदं मिळतात, मात्र लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख ही सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राला समर्पित काम करेन, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केला. मी पदासाठी आणि खुर्चीसाठी कदापि कासावीस झालो नाही आणि होणार नाही. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला काय मिळाल हे पाहणारा मी आहे. सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे. लोक शिवसेनेत येत आहे कारण हा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेअर मार्केटमध्ये जसा गुंतवणूकदारांचा विश्वासावर चालतो, तसं शिवसेनेचे आहे. तुमचा विश्वास कदापि तुटू देणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.