थंडी डिसेंबरमध्येच; किमान तापमान वाढले
By Admin | Updated: November 18, 2014 02:56 IST2014-11-18T02:56:54+5:302014-11-18T02:56:54+5:30
बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र याचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत आहे

थंडी डिसेंबरमध्येच; किमान तापमान वाढले
मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहू लागले असले तरी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पूर्वेकडून वाहणाऱ्या वा-याचा वेग कायम असल्याने हुडहुडी भरविणारी थंडी मुंबईकरांना डिसेंबरमध्येच अनुभवास मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र याचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत आहे. मात्र या वातावरणीय बदलाच्या परिणामादरम्यान पडलेल्या पावसामुळे किमान व कमाल तापमानात चढ-उतार झाली आहे. चक्रीवादळामुळे २० अंश एवढे खाली उतरलेले किमान तापमान पुन्हा २५ अंशाच्या घरात नोंदविण्यात येऊ लागले असून, कमाल तापमानदेखील ३५ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. परिणामी ऐन थंडीत बदलत्या वातावरणाला सामोरे जावे लागत असून, उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी सागरापासून दक्षिण-गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत असणारा कमी दाबाचा पट्टा आता पश्चिमेकडे सरकला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. पुढील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहील. पुणे आणि मुंबईत आकाश अंशत: ढगाळ राहील; तर मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल. (प्रतिनिधी)