निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आचारसंहिता
By Admin | Updated: September 10, 2014 00:45 IST2014-09-10T00:45:44+5:302014-09-10T00:45:44+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक

निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांना आचारसंहिता
जिल्हाधिकारी कार्यालय: बायोमेट्रिक नोंद सक्तीची
नागपूर: जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजाला शिस्त लावतानाच कामाच्या वेळेत कार्यालयात अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यासाठी सोमवार १५ सप्टेबरपासून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या शिवाय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे नाव व पदनामाची पाटीही लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जे कर्मचारी किंवा अधिकारी बायोमेट्रिकमध्ये नोंद करणार नाही त्यांना गैरहजर समजून त्या दिवसाचे वेतन व भत्ते दिले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत त्यांच्या विभागात अनुपस्थित राहात असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तेथील विविध विभागांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना संपूर्ण कार्यालयात भटकंती केल्याशिवाय पर्याय नसतो. अनेकदा त्यांना चुकीची माहिती दिली जाते. नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी त्यांच्या नावाचा व पदनामाचा नाम फलक दर्शनी भागात लावावा. त्याच प्रमाणे प्रत्येक शाखेत रोज होणाऱ्या कामाची माहिती जनतेला माहिती व्हावी यासाठी नागरिकांची सनद लावण्यात यावी व त्याची एक प्रत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना द्यावी, त्याच प्रमाणे ती संकेतस्थळावरही टाकण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणाऱ्या फाईल्सवर संकलन क्रमांक नोंद करणे, त्याच प्रमाणे फाईलची बांधणी योग्य पद्धतीने करणे, निपटारा झालेल्या फाईल्सच्या नोंदी करून त्या ३० नोव्हेबरपर्यत अभिलेखा कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. संगणकाचा वापर करताना वेगवेगळे फॉन्ट्स वापरले जातात. त्यात साम्यता येण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी युनिकोड वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)