युती तुटणार नाही, समजा तुटलीच तरी भाजपाला पाठिंबा नाही - शरद पवार
By Admin | Updated: October 14, 2015 16:33 IST2015-10-14T16:33:46+5:302015-10-14T16:33:46+5:30
शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही

युती तुटणार नाही, समजा तुटलीच तरी भाजपाला पाठिंबा नाही - शरद पवार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असं मला वाटत नाही, परंतु समजा काही कारणानं युती तुटलीच तरी सुरुवातीला घेतलेली भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका आता राष्ट्रवादी घेणार नाही असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी शिवसेना स्वत:चेच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सत्ता स्थापन केल्यानंतर मागाहून शिवसेना सत्तेत सामील झाली, त्यामुळे आता बाहेर पडायचा प्रश्न आला तर शिवसेनेनेच बाहेर पडायला हवं असं पवार म्हणाले. एक वर्षापूर्वी स्थिर सरकार ही गरज होती त्यामुळे आम्ही भाजपाला पाठिंबा दिला होता असे सांगत आता तशी वेळ नसल्याचे पवार म्हणाले. अर्थात, शिवसेना असं काही करेल असं मला वाटत नाही असं सांगतानाच, समजा तसं झालंच तर आता एका वर्षानंतर भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही असे सांगत थोडक्यात मुदतपूर्व निवडणुका होऊ शकतील असे संकेत पवारांनी दिले आहेत. कसुरी यांच्या कार्यक्रमासंदर्भात घडलेला प्रकार अशोभनीय असून भाजपाला जबाबदारी टाळता येणार नाही असेही पवार म्हणाले.
शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलेले महत्त्वाचे मुद्दे:
- सुरूवातीला स्वाभिमानी बाणा दाखवणारे लोक आता सोशिक भूमिकेत शिरले आहेत, वेळोवेळी त्यांचा अपमान होऊनही, त्यांची जागा दाखवण्यात आली असूनही ते सहन करत त्यांनी खुर्ची सोडण्याची तयारी दाखवलेली नाही.
- सनातनची भाषा चिंताजनक आहे, सरकारने कडक भूमिका घ्यावी.
- भाजपा राज्यातील मोठा पक्ष, त्यांना जबाबादारी टाळता येणार नाही.
- कसुरींच्या कार्यक्रमाबाबत जे घडलं ते अशोभनीय होतं.
- आम्ही कधीही सरकारमध्ये सहभागी होणार नाही, सरकारला पाठिंबाही देणार नाही.
- शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही.
- साहित्यिकांनी चिंता व्यक्त केली आहे, ते काळजी करण्यासारखे आहे.
- हे सरकार चालेल की नाही हे माहीत नाही, पण ते टिकेल.
- आज सहिष्णुता दिसत नाही, राज्यातील अतिरेकी पावलांचे समर्थन केले जात आहे.
- दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे.
- देशातील आणि राज्यातील वातावरण चिंताजनक आहे.
- कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळत नाही अन्नसुरक्षा योजनेची अद्याप अमलबजावणी नाही.
- पंतप्रधान नद्र मोदींनी शेतक-यांची फसवणूक केली आहे.
- सरकारची दुष्काळग्रस्त भागाला ठोस मदत नाही.