साखर सहसंचालकांना घेराव
By Admin | Updated: January 31, 2015 05:05 IST2015-01-31T05:05:10+5:302015-01-31T05:05:10+5:30
उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे शुक्रवारी साखर सहसंचालकांना घेराव घालत दोषी कारखान्यांवर फौजदारी कारवाई करेपर्यंत कार्यालयात बसू देणार नसल्याचा इशारा दिला.

साखर सहसंचालकांना घेराव
कोल्हापूर : उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे शुक्रवारी साखर सहसंचालकांना घेराव घालत दोषी कारखान्यांवर फौजदारी कारवाई करेपर्यंत कार्यालयात बसू देणार नसल्याचा इशारा दिला.
साखर कारखान्यांचे हंगाम संपत आले तरी गाळप झालेल्या ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहात काय, असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक वाय.व्ही. सुर्वे यांना केला
आणि खुर्चीवरून त्यांना अक्षरश: हाकलून लावले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला होता.
आयुक्तांकडे कारवाईबाबत पत्रव्यवहार केला असल्याचे सुर्वे यांनी सांगिंतले; पण आयुक्तांच्या नोटिसांचे काही सांगू नका. तुम्ही पोस्टमनचे
काम करणार असाल तर तुमच्यासह या खुर्चीची कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना गरज नसल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मला ते अधिकार नसल्याचे सुर्वे यांनी सांगितल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात
केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; पण ते
ऐकत नसल्याचे पाहून सुर्वे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर
नेण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी टेबल व टेलिफोनची आदळआपट केली. अखेर संजय पवार यांनी त्यांना शांत केले. (प्रतिनिधी)