मुंबई बँकेत सहकार पॅनेलचा विजय
By Admin | Updated: May 8, 2015 04:51 IST2015-05-08T04:51:09+5:302015-05-08T04:51:09+5:30
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजपा या निवडणुकीत आमने-सामने उभे

मुंबई बँकेत सहकार पॅनेलचा विजय
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेले सेना-भाजपा या निवडणुकीत आमने-सामने उभे ठकल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत भाजपा आणि इतर पक्षांच्या सहकार पॅनेलने शिवसेनेला शह दिला आहे. एकूण २१पैकी तब्बल १७ जागा जिंकून सहकार पॅनलने आपले वर्चस्व राखले आहे.
विविध आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी दादर येथील डिसिल्वा हायस्कूलमध्ये झाली. या निवडणुकीत सहकार पॅनेलने १७ जागा जिंकल्या आहेत; तर शिवसेनेतर्फे निवडणूक लढविणाऱ्या शिवप्रेरणा पॅनेलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत सहकार पॅनेलचे शिवाजीराव नलावडे, प्रवीण दरेकर, नंदकुमार काटकर, सिद्धार्थ कांबळे, भिकाजी पारले हे नेते भरघोस मताधिक्याने निवडून आले आहेत. या वेळी सहकार पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये काटकर यांनी इतर सहकारी संस्था मतदारसंघातून १३३८पैकी तब्बल ११४४ मते मिळवून विजय प्राप्त केला. तर मजूर सहकारी संस्था मतदारसंघातून प्रवीण दरेकर व त्यांचे सहकारी आनंदराव गोळे यांनी एकूण ६८५पैकी अनुक्रमे ६२६ व ५४३ मते मिळविली आहेत.
सहकार पॅनेलला भरघोस यश मिळत असताना पॅनेलचे ज्येष्ठ नेते एल.एच. गाजरे यांना व्यक्तिगत सभासदांच्या मतदारसंघातून अवघ्या १६ मतांनी पराभव पत्करावा लागला. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक प्रदीप सामंत व मनसेचे कार्यकर्ते संजय घाडी यांना पराभव पत्करावा लागला.