‘सीएम’ नॉनस्टॉप...

By Admin | Updated: November 4, 2014 01:05 IST2014-11-04T01:05:53+5:302014-11-04T01:05:53+5:30

शहरात पाय ठेवल्यापासून सातत्याने होणारा शुभेच्छांचा वर्षाव, हितचिंतकांचा गराडा अन् आपल्या नेत्याकडे समस्या घेऊन येणारी जनता. विश्रांती घ्यायला, जेवायला इतकेच काय पण पाणी प्यायलादेखील वेळ नाही.

'CM' nonstop ... | ‘सीएम’ नॉनस्टॉप...

‘सीएम’ नॉनस्टॉप...

दोनच तास घेतली विश्रांती : थकवा नाही-त्रागा नाही, आपुलकीने संवाद
योगेश पांडे - नागपूर
शहरात पाय ठेवल्यापासून सातत्याने होणारा शुभेच्छांचा वर्षाव, हितचिंतकांचा गराडा अन् आपल्या नेत्याकडे समस्या घेऊन येणारी जनता. विश्रांती घ्यायला, जेवायला इतकेच काय पण पाणी प्यायलादेखील वेळ नाही. दोन दिवसांत केवळ दोन तासांची झोप. इतके असूनही चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा थकवा नाही किंवा कशाचाही त्रागा नाही. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी नम्रपणे व हसतमुखाने संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कामाप्रतीची निष्ठा नागपूरकरांना अनुभवायला मिळते आहे. इतक्या गोंधळातदेखील त्यांनी शहर, विदर्भ अन् राज्याच्या प्रश्नांविषयी अधिकाऱ्यांशी सोमवारी दिवसभर सखोल चर्चा केली. ‘पीएम’ मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘सीएम’ फडणवीसदेखील ‘नॉनस्टॉप’ कामाला लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
रविवारी ४.३५ वाजता मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस प्रथमच उपराजधानीत आले. यावेळी विमानतळापासून निघालेल्या स्वागत रॅलीत नागरिकांची ‘हाऊसफुल्ल’ गर्दी होती अन् फडणवीस यांना धरमपेठ येथील निवासस्थानी पोहोचण्यासाठी रात्रीचे ८.३० वाजले. परंतु त्यांच्या घराजवळदेखील हजारो समर्थक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. रात्री २.१५ वाजेपर्यंत फडणवीस हे हितचिंतकांना भेटले. रात्री ३ वाजता झोपल्यानंतर पहाटे ५ वाजता त्यांना दिवस निघाला.
सोमवारी पहाटेपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. दिवसभराचे नेमके वेळापत्रक काय राहणार आहे व कुठल्या विषयांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे, याची माहिती घेतली.
मी तुमचा देवेंद्रच
रविवारी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर अगदी मध्यरात्रीनंतरदेखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरासमोर गर्दी होती. रात्री २.१५ वाजेपर्यंत फडणवीस हे हितचिंतकांना भेटले. फडणवीस झोपायला जात असतानाच दक्षिण-पश्चिम नागपुरातील एक म्हातारे दाम्पत्य भेटण्यासाठी बराच वेळ बाहेर थांबले असल्याची माहिती त्यांना कळली. त्यावेळी विश्रांतीकरिता निघालेले मुख्यमंत्री फडणवीस परत आले व त्यांनी वृद्ध दाम्पत्याची भेट घेतली. ‘साहेब, फक्त तुमचे स्वागत करायला व तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो होतो. बाकी कुठलेही काम नाही’ असे वृद्ध दाम्पत्य म्हणाले. यावर मुख्यमंत्री नम्रपणे म्हणाले, ‘कृपया मला साहेब म्हणू नका, मला देवेंद्रच म्हणा. कुठल्याही पदापेक्षा तुमच्यासारख्या नागरिकांचे प्रेम व शुभेच्छाच माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. मी २४ तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. यावेळी फडणवीस यांनी वृद्ध दाम्पत्याची आस्थेने चौकशी केली. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सोडताना कृतकृत्यतेचे आणि समाधानाचे भाव या वृद्ध दाम्पत्याच्या चेहऱ्यावर होते.

Web Title: 'CM' nonstop ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.