CM Devendra Fadnavis News: २०२४मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून महायुतीत चांगल्याच कुरबुरी झाल्याचे पाहायला मिळाले. नाराजीचे मानापमान नाट्य रंगले. आता पालकमंत्रीपदावरून याच मानापमान नाट्याचा पुढचा अंक पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार सक्रीय झाले आहेत. अशातच अधिक विश्वासू सहकारी कोण, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.
जिव्हाळा संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यात आली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांना अगदी दिलखुलास पद्धतीने उत्तरे दिली. देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर प्रश्न विचारले गेले. त्यात पहिलाच प्रश्न राज ठाकरे की उद्धव ठाकरे असा विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारणात काही पक्क नसते. आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे झाले. आता राज ठाकरे मित्र आहेत पण उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अधिक विश्वासू सहकारी कोण, एकनाथ शिंदे की अजित पवार?
मनापासून विश्वास टाकावा असा अधिक विश्वासू सहकारी कोण, एकनाथ शिंदे की अजित पवार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. याचे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माझ्यापुरते विचाराल तर या दोन्ही नेत्यांशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्या दोघांचे वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळे डायनॅमिक्स असू शकतात. एकनाथ शिंदे आणि माझी जुनी मैत्री आहे. परंतु, अजित पवार यांच्याकडे जी राजकीय परिपक्वता आहे त्यामुळे त्यांची आणि माझी व्हेवलेंथ जुळते, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, संयम, सहनशिलता याची अपूर्व देणगी राजकारणातून मिळाली असे एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळ प्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. मागील पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.