CM Devendra Fadnavis on Manikrao Kokate: वादग्रस्त वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे विधिमंडळातल्या एका व्हिडीओमुळे अडचणीत सापडले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात माणिकरावर कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. या व्हिडीओवरुन विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जे काही घडलं आहे ते भूषणावह नसल्याचे म्हटलं आहे.
विधिमंडळात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. मात्र माणिकराव कोकाटे यांनी हे आरोप फेटाळून लावले. माणिकराव कोकाटे यांनी यूट्यूब सुरु केल्यावर ती जाहिरात आली होती असं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत नव्हते तर ते जंगली रमीच खेळत होते असा दावा करणारे आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
"विधानभवनामध्ये ज्यावेळी चर्चा चालते, तेव्हा आपलं कामकाज नसलं तरीही आपण सिरियसली बसणं गरजेचं आहे. साधारपणे एखाद्या वेळी असं होतं तुम्ही कागदपत्र वाचता, बाकी गोष्टी वाचता. पण रमी खेळतानाचा व्हिडीओ हा निश्चितच योग्य नाही. अर्थात माणिकराव कोकाटेंनी खुलासा दिला आहे की मी रमी खेळत नव्हतो, अचानक पॉप अप झालं वगैरे. पण जरी त्यांनी सांगितलं असलं तरी एकूण जे काही घडलं आहे ते आम्हाला भूषणावह नाही," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, माणिकराव कोकाटेंच्या व्हिडीओ प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. "माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली आहेत. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली. पण काल जो प्रकार समोर आला त्यानंतर काय करायचं याचा निर्णय अजित पवार घेतील," असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.