CM Devendra Fadnavis News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील दहशतीवरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने जोरदार हल्लाबोल करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेटल्याचे समोर आल्याने वादळ निर्माण झाले. सुरेश धस यांच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर गदा येणार की काय, अशी परिस्थिती असताना या 'गळाभेटी'ची बातमी समोर आली. तर, अजित पवार गटाने धनंजय मुंडेंना पक्षाच्या कोअर ग्रुपमध्ये स्थान दिल्याचे जाहीर केले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे सूतोवाच केले. तसेच चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असा गौप्यस्फोट केला. आम्ही काही वेळ एकत्र होतो. दोघांमध्ये मनभेद नाही; थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. मुंडे यांनी माझ्यासोबत काम केले आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो, मी कोणालाही तडजोड करायला सांगितले नाही, असे बावनकुळेंनी सांगितले. यानंतर आता
...तर ते योग्य नाही
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोण कोणाला भेटले, यावर राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे. तसेच सुरेश धस यांनी मस्साजोगच्या प्रकरणात खंबीर भूमिका घेतलेली आहे. त्यांची भूमिका सर्वांनी पाहिली आहे. अशा प्रकारे खंबीर भूमिका घेत असताना कोणाशी संवाद तोडून टाकायचा असे करण्याची आवश्यकता नाही. कारण धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत. मग एखादा आमदार एखाद्या मंत्र्यांना भेटला तर कोणताही फरक पडत नाही. तसेच सुरेश धस यांनी सांगितले आहे की, धनंजय मुंडेंची भेट घेतली असली तरी कोणत्याही परिस्थितीत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. हाच हेतू समोर ठेवून काम करत आहेत. पण काही लोकांना असे वाटते की, सुरेश धस पुढाकार का घेत आहेत? यावरून त्यांच्या पोटात दुखत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो. या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांची त्याबाबतीमधील प्रतिक्रिया झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मी भेटल्याचे समोर आले किंवा ते लीक करण्यात आले. याबाबत माझे असे मत आहे की, याबाबत कोणीतरी व्यवस्थित माझ्याविरोधात षड्यंत्र रचते. हे षड्यंत्र कोण रचते हे मला माहिती आहे. ही गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. तसेच हे जे कोण षड्यंत्र रचते, त्याचा पर्दाफाश योग्यवेळी करणार आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.