मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकएक करून आपल्या पक्षातील सहकाऱ्यांचा काटा काढतायत, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही ओळी मराठीत बोलल्यानंतर राज्यपालांनी इंग्रजीत भाषण करायला सुरुवात केली. यावेळी सरकारी अनुवादकांकडून या भाषणाचा अनुवाद केले जाणे अपेक्षित होते. मात्र, अनुवादक कक्षात उपस्थित नसल्याने ऐनवेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या भाषणाचा अनुवाद केला. त्यावरून विरोधक प्रचंड संतापले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत झाल्या प्रकाराबद्दल सदनाची माफी मागितली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सरकारने मराठी भाषेचा खून केल्यानंतर आता मुख्यमंत्री माफी मागत असल्याची टीका केली. यावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाले. केवळ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा अनुवाद होऊ शकला नाही, म्हणून मराठी भाषेचा खून झाला, हा विरोधकांचा आरोप व्यर्थ आहे. मराठी भाषा इतकी लेचीपेची नाही. हे सांगताना सुधीर मुनगंटीवार यांचा आवाज खूपच चढला होता. यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिकपणे टोला लगावला. गेल्या अधिवेशनाच्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा घसा बसला होता. हाच धागा पकडत अजित पवारांनी म्हटले की, यंदाही ओरडल्यामुळे मुनगंटीवारांचा घसा बसला तर अर्थसंकल्प कोण मांडणार? मुख्यमंत्रीसाहेब तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता. तुम्ही एकेकाचे काटे काढत आहात, असा शाब्दिक चिमटा अजितदादांनी काढला. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.राज्यपालांच्या अभिभाषणात झालेली चूक ही अक्षम्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मराठीत अनुवाद नसल्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना अनुवादक म्हणून बसावे लागले. हे अत्यंत गंभीर आहे. दोषींना घरी पाठवले पाहिजे. हे प्रकरण विधी मंडळाच्या कक्षेत येत असले तरी मी माफी मागतो, असे फडवणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकेक करून सहकाऱ्यांचा काटा काढताहेत; अजित पवारांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 15:40 IST