बँकांच्या संपाने ग्राहक मेटाकुटीला
By Admin | Updated: March 1, 2017 04:53 IST2017-03-01T04:53:51+5:302017-03-01T04:53:51+5:30
देशातील खाजगी, विदेशी व राष्ट्रीयीकृत बँकांतील १० लाख बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप केला.

बँकांच्या संपाने ग्राहक मेटाकुटीला
मुंबई : कामगार कायद्यात होणारे बदल आणि बँकिंग यंत्रणेतील समस्यांविरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशातील खाजगी, विदेशी व राष्ट्रीयीकृत बँकांतील १० लाख बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसाचा संप केला. महिन्याअखेरीस केलेल्या या संपामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र मेटाकुटीला आले होते. खिशात पैसे नसल्याने घराच्या हफ्त्यापासून विविध कर्जांचे हफ्ते भरण्यासाठी शेवटच्या दिवशी बँक बंद असल्याने सर्वसामान्यांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
बँक कर्मचारी संघटनांची कृती समिती असलेल्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने या संपाची हाक दिली होती. त्यानुसार काम बंद करून बँक कर्मचारी आझाद मैदानावर धडकले होते. सरकारविरोधात निदर्शने करत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधातील रोष व्यक्त केला. संघटनेचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, नोटाबंदीनंतर दिवसरात्र काम केलेल्या बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना केलेल्या कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. बँकांमध्ये प्रचंड काम असतानाही कायमस्वरूपी कामासाठी शासन कंत्राटी पद्धतीने भरती करत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी कामासाठी कायमस्वरूपी नोकर भरती करण्याची मागणी संघटनेने केली आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बँकांचे शटर बंदच राहिले. (प्रतिनिधी)
<बँक एटीएमचा दिलासा नाहीच
एरव्ही बँका बंद असल्यानंतर ग्राहकांना एटीएमचा दिलासा असायचा. मात्र आधीच बहुतेक एटीएम बंद असल्याने ग्राहकांना पैशांसाठी चांगलीच पायपीट करावी लागली. त्यात बहुतेक एटीएम सेवा दुपारनंतर मोडकळीस आल्या होत्या. परिणामी, नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा ग्राहकराजा एटीएमबाहेरील रांगेत दिसला.