अंबरनाथचे आणखी ७ कारखाने बंद
By Admin | Updated: September 10, 2016 01:58 IST2016-09-10T01:58:46+5:302016-09-10T01:58:46+5:30
रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने डोंबिवली व अंबरनाथमधील बंद झालेल्या १४२ कारखान्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे

अंबरनाथचे आणखी ७ कारखाने बंद
मुरलीधर भवार,
डोंबिवली- रासायनिक सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याने डोंबिवली व अंबरनाथमधील बंद झालेल्या १४२ कारखान्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करावे, असा आदेश देत राष्ट्रीय हरित लवादाने त्यावरील सुनावणी २३ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तोवर हे कारखाने बंद राहणार आहेत. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील आणखी सात कारखाने बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
रासायनिक सांडपाणी प्रक्रियेचे निकष न पाळणाऱ्या डोंबिवलीतील ८६ व अंबरनाथमधील ५६ कारखान्यांच्या सांडपाणी प्रक्रियेवर २ जुलैपासून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने बंदी घातली. तेव्हापासून हे कारखाने बंद आहेत. कारखानदारांनी या कारवाईस स्थगिती मिळावी यासाठी लवादाकडे दाद मागितली. स्थगितीसाठी याचिका दाखल केली. ११ जुलैपासून या याचिकेवर केवळ तारखा पडत आहेत. कारखानदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर केलेल प्रतिज्ञापत्र आता लवादासही सादर करावे. ते सादर केल्यावर त्यावर २३ सप्टेंबरला सुनावणी होईल, असे लवादाकडून स्पष्ट करण्यात आले.
१५२ कारखाने बंद करण्यात आलेले असताना २ जुलैपासून आजपर्यंत सांडपाणी प्रक्रियेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने अंबरनाथमधील पाच कारखान्यांना नोटीस बजावली होती. त्यांनी ‘बंद’च्या नोटिशीचेही उल्लंघन केले. त्याचबरोबर अंबरनाथमधील अन्य सात रासायनिक कंपन्यांना बंदीचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले. त्याची नोटीस एमआयडीसीलाही बजावली आहे.
>इतिवृत्तच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात मंत्रालयात एक बैठक घेऊन कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. त्याचे इतिवृत्तच तयार झाले नसल्याने ते लवादाकडे सादर केले गेले नाही. त्यामुळे या बैठकीचा फायदा कारखानदारांना झालेला नाही.
>चेंबर बंदची नोटीस : कारखाने बंद असूनही डोंंबिवली पूर्वेतील रामचंद्र नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद कारखान्यांचे सांडपाणी वाहून नेणारे चेंबर एमआयडीसीने कॉन्क्रीट टाकून बंद करावे, अशी नोटीस १५२ कारखानदारांना काढली आहे. त्यामुळे कारखान्यांची प्रसाधनगृहे व मुताऱ्यांचे मलमूत्र तुंबण्याची शक्यता आहे. प्रदूषण मंडळाच्या कारवाईचा हा अतिरेक असल्याची प्रतिक्रिया कारखानदार देवेन सोनी यांनी व्यक्त केली आहे.
>लवादाकडे लक्ष : कारखानदारांच्या याचिकेवर सुनावणी २३ सप्टेंबरला होणार असली तरी ‘वनशक्ती’ या पर्यावरण संस्थेच्या याचिकेवर १४ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रात काय सुधारणा झाली? किती प्रमाणात प्रदूषण रोखले, याचा अहवाल वन व पर्यावरण खात्याच्या संचालकांनी आठवडाभरात लवादाला द्यायचा आहे, असे आदेश लवादाने ३१ आॅगस्टला दिले होते. आता त्यात मुदतवाढ दिली जाणार नाही. कारण लवादाकडे हे प्रकरण २०१३ पासून सुरु आहे. एप्रिल २०१५ पासून वारंवार मुदतवाढ दिल्याचे लवादाने म्हटले आहे. त्यामुळे १४ सप्टेंबरला लवादाकडून काय आदेश दिले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
>कृत्रिम तलावांचा देखावा
गणेशोत्सवात जलाशयाचे प्रदूषण रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने विसर्जनासाठी ५० कृत्रिम तलाव तयार केले आहेत. ही स्वागतार्ह बाब असली तरी कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या गण्ोशमूर्ती एका ट्रकमध्ये भरून पुन्हा खाडीतच विसर्जित केल्या जात असल्याने प्रदूषणामुळे आधीच ‘डेड झोन’ झालेल्या कल्याण खाडीत प्रदूषणाची भर पडते आहे. त्यामुळे महापालिकेने कृत्रिम तलावांचा देखावा बंद करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.