डाव्या पक्षांकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक
By Admin | Updated: February 21, 2015 12:12 IST2015-02-21T12:10:36+5:302015-02-21T12:12:39+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

डाव्या पक्षांकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ डाव्या संघटांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पानसरे यांची हत्या झाल्याने जनतेत आक्रोश आहे. पुरोगामी विचारधारांनी उद्या रस्त्यावर उतरुन कारभार बंद ठेवावा असे आवाहन डाव्या पक्षाचे नेेते भालचंद्र कांगो यांनी केले आहे.
गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शुक्रवारी रात्री पानसरे यांचे मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या हत्येचे वृत्त समजताच कोल्हापूरमध्ये शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून कोल्हापूरमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. डाव्या पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्या (रविवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बारावीच्या परीक्षा असल्याने आम्ही आज किंवा सोमवारी बंद ठेवणार नाही. उद्या रविवार असल्याने पुरोगामी विचारांनी बंद पाळावा असे त्यांनी सांगितले.