खेड-शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली बंद करावी
By Admin | Updated: September 20, 2016 01:52 IST2016-09-20T01:52:52+5:302016-09-20T01:52:52+5:30
पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली तत्काळ बंद करावी,

खेड-शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली बंद करावी
नसरापूर : पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली तत्काळ बंद करावी, अशी मागणी मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने चंदूभय्या परदेशी यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
सारोळा ते शिंदेवाडी (ता.भोर) दरम्यान महामार्ग रस्तारुंदीकरण व विकसनाची कामे निकृष्ट झाली आहेत. सातारा महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरूआहे, तर अनेक ठिकाणची कामे ठप्प होऊन थांबलेली आहेत. या थांबलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात होऊन जीवितहानी झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे सुरू आहेत. महामार्गावरील रस्त्यांच्या कामात कुठल्याही प्रकारचे सातत्य न राहता निकृष्ट प्रतीचे कामच केले गेले आहे. रस्तेबांधणीचा दर्जाही खालावलेला आहे. यातूनच महामार्गावर कात्रज-शिंदेवाडी ते सारोळ्यापर्यंत अनेक ठिकाणी जागोजागी मोठमोठे असंख्य खड्डे पडलेले आहेत.
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत खेड-शिवापूर टोलनाक्याची टोलवसुली करू नये, अशी मागणी चंदूभय्या परदेशी, पंजाब शिंदे, अमोल लिम्हण, गोरख लिम्हण, नाना घोरे, सतीश यनपुर आदींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.
महामार्ग रस्तारुंदीकरण व विकसनाची कामे पूर्ण झाल्याशिवाय खेड-शिवापूर टोलनाक्यावरील वाहनांची टोलवसुली बंद करावी, अशी मागणी मैत्री प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली असता, हे निवेदन मंत्री महोदय नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येत असल्याने गडकरी यांनाच द्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचित करण्यात आले असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
(वार्ताहर)