पॉलिटेक्निक डिप्लोमा बंद करणार?
By Admin | Updated: March 3, 2015 02:18 IST2015-03-03T02:18:58+5:302015-03-03T02:18:58+5:30
पॉलिटेक्निक पदविका प्राप्त केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात.

पॉलिटेक्निक डिप्लोमा बंद करणार?
पुणे : पॉलिटेक्निक पदविका प्राप्त केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. त्यामुळे पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विचार केला जात असून, त्यासंदर्भात लवकरच प्राचार्यांची बैठक बोलविली जाणार आहे, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी सांगितले. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
येथील कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या रौप्यमहोत्सवी पदवी प्रदान समारंभप्रसंगी तावडे बोलत होते. अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश का घेतात, थेट पदवी अभ्यासक्रमास प्रवेश का घेत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे पदविका अभ्यासक्रम बंदच करण्याचा विचार होत आहे. त्याचप्रमाणे देशभर स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ८०० हून अधिक कौशल्यांचे शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपोआप रोजगार मिळणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.