राज्यातील नेत्रपेढ्या एका क्लिकवर...
By Admin | Updated: June 9, 2016 00:51 IST2016-06-09T00:51:28+5:302016-06-09T00:51:28+5:30
शासनस्तरावर ‘नेत्रपेढ्यां’चे केंद्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज्यातील नेत्रपेढ्या एका क्लिकवर...
पुणे : शासनस्तरावर ‘नेत्रपेढ्यां’चे केंद्रीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या माध्यमातून सर्व नेत्रपेढ्या एकमेकांशी आॅनलाइन पद्धतीने जोडल्या जाणार असून, नेत्रांची गरज आणि त्याची पूर्तता याची अधिकृत नोंद शासनदरबारी होणार आहे. त्यामुळे नेत्रदानाच्या चळवळीला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या काही वर्षांत नेत्रदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून अनेक जण त्यासाठी पुढे येत आहेत. याशिवाय कुठल्या रुग्णालयाला कोणत्या अवयवाची गरज आहे, याची कोणतीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे अवयवदानाच्या मोहिमेला म्हणावे तेवढे यश मिळू शकलेले नाही. नेत्रदानही त्याला अपवाद ठरलेले नाही.
राज्यात अनेक नेत्रपेढ्या कार्यरत असून, त्यांच्याकडे मृत व्यक्तींचे डोळे दान केले जातात. एखाद्या नेत्रपेढीला महिन्याला १० रुग्णांचे नेत्र मिळत असतील, मात्र तेवढी त्यांना गरज नसेल तर त्यांना दुसऱ्यांना देणे ते सहज शक्य आहे. या सर्व नेत्रपेढ्यांचे केंद्रीकरण करून त्या इंटरनेटद्वारे आॅनलाइन जोडण्याचा उपक्रम शासनाकडून हाती घेण्यात आलेला आहे. याच्या पुढच्या टप्प्यात नेत्ररोपण करणारी रुग्णालयेही या संगणक प्रणालीशी जोडण्यात येणार आहेत.