विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’

By Admin | Updated: September 5, 2016 02:44 IST2016-09-05T02:44:15+5:302016-09-05T02:44:15+5:30

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे.

Cleanliness 'soldier' | विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’

विद्यार्थी बनणार स्वच्छता ‘सैनिक’


नवी मुंबई : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने शाळेत आणि त्यांचे घर, सोसायटीपासून स्वच्छतेला सुरुवात करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना राबविली जाणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, प्रमुख शिक्षकांच्या सहभागाने नुकतीच विष्णुदास भावे नाट्यगृहात या उपक्रमाच्या माहितीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेतंर्गत आयुक्तांनी ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना स्पष्ट केली.
कचरा निर्माण होतो, त्याच ठिकाणी त्याचे १०० टक्के वर्गीकरण होईल या कल्पनेतून ‘स्वच्छता सैनिक’ ही संकल्पना तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून नवी मुंबईची भावी पिढी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम करेल, आणि स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहर आणखी स्वच्छ व सुशोभित होईल, असा विश्वास मुंढे यांनी व्यक्त केला.
घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ नुसार तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्मितीच्या पातळीवरच कचरा वर्गीकरण करणे हे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने २ आॅक्टोबरपर्यंत शहरात १०० टक्के ओला - सुका कचरा वर्गीकरण झाले पाहिजे, हे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळेत संकल्पनेविषयीची माहितीपुस्तिका व सीडी वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>मुख्याध्यापक, शिक्षकांचा सहभाग
‘स्वच्छता सैनिक’ या संकल्पनेंतर्गत प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक हे मुख्य प्रशिक्षक व
शिक्षक हे वर्गप्रमुख असणार आहेत. प्रत्येक वर्गशिक्षक वर्गातून एका मुलाची व मुलीची
स्वच्छता सैनिक कर्णधार म्हणून निवड करतील. हे कर्णधार वर्गातील स्वच्छताविषयक उपक्र मांचा आढावा घेतील.
याशिवाय वरच्या वर्गातून आणखी एक स्वच्छता सैनिक निवडला जाईल, जो शालेय स्तरावरील स्वच्छता कार्यक्र मांचे नियोजन व अवलोकन करेल. अशाप्रकारे वरच्या वर्गातून १० ते १५ विद्यार्थ्यांचा समूह निवडून शालेय स्तरावर स्वच्छताविषयक विविध कार्यक्र म राबविण्यात येतील.
>सोसायटीत साधारणत: १०-१२ मुलांचा एक गट निर्माण केला जाणार आहे. या गटाव्दारे त्यांच्या कुटुंबात तसेच त्यांच्या सोसायटीत कचरा वर्गीकरण योग्य रीतीने होते आहे की नाही तसेच तो वेगवेगळ्या डब्यात ठेवला जातो आहे की नाही, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कचरा गाडीत देतानाही वेगवेगळा दिला जातो आहे की नाही याचे निरीक्षण केले जाईल.कचरा वर्गीकरण न करणाऱ्या कुटुंबाला त्याचे महत्त्व ही मुले पटवून देतील तसेच घरकाम करणाऱ्या व्यक्तींना आणि वॉचमन यांनाही याबाबतचे महत्त्व समजून सांगतील.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. ईटीसी केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त तुषार पवार, शिक्षणाधिकारी संदीप सांगवे आदी उपस्थित होते.

Web Title: Cleanliness 'soldier'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.