स्वच्छता अभियान यांचे अन् त्यांचेही..!
By Admin | Updated: November 17, 2014 23:23 IST2014-11-17T22:29:03+5:302014-11-17T23:23:39+5:30
इस्लामपुरातील स्थिती : अधिकाऱ्यांना मोजे-गमबूट, कर्मचारी मात्र वंचित

स्वच्छता अभियान यांचे अन् त्यांचेही..!
युनूस शेख-इस्लामपूर -शहरात सध्या मोठ्या धामधुमीत सकाळी फक्त दोन तासात संपूर्ण प्रभाग स्वच्छ करण्याची कामगिरी सुरु आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार पालिका हे अभियान राबवत आहे. यातील ठळक फरक ेम्हणजे अभियानात स्वच्छता करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या हाताला मोजे, तोंडाला मास्क आणि पायात गमबूट अशा सुविधा होत्या. तर इकडे दररोज स्वच्छता करणारे कर्मचारी मात्र या सुविधांपासून वंचित आहेत. नियमाने त्यांना या सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र त्याकडे नेहमीच कानाडोळा होत असतो. कारण अस्वच्छता त्यांच्या पाचवीलाच पूजलेली असते.
शहरात १४ नोव्हेंबरपासून हे स्वच्छता अभियान सुरु आहे. प्रत्येक प्रभागात सकाळी दोन तास हे अभियान चालते. त्यातून संपूर्ण प्रभाग स्वच्छ होतो, असा पालिकेचा दावा आहे. सात दिवसात सात प्रभाग, असा स्वच्छतेचा कार्यक्रम आहे. पालिकेकडे स्वच्छतेसाठी ठेकेदार आहे. त्यांच्याकडे जवळपास १५0—२00 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा आहे. त्यांनाही हा स्वच्छतेचा भार पेलवत नाही. मग दोन तासात संपूर्ण प्रभाग स्वच्छ, ही कवीकल्पना पटण्यासारखी वाटत नाही.
शहरातील नालेसफाई आणि त्यातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी ठेकेदारांकडील यंत्रणेच्या दिवसभरात चार—चार फेऱ्या कचरा डेपोकडे होतात. त्यामध्ये कर्मचारी अक्षरश: पिळून निघतात. स्वच्छतेच्या कामासाठी त्यांना सुरक्षात्मक अशा कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. शहरात एका बाजूला डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र दुसऱ्या बाजूला शहरातील कचरा खुलेआमपणे उघड्यावरच नेला जातो. त्यातून हवेचे प्रदूषण, रोगराई पसरवणाऱ्या जंतूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र या बाबींकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
स्वच्छता अभियानात अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी घेतलेली उडी निश्चितच कौतुकास्पद आहे. स्वच्छता करताना त्यांनी जे नियम व सुरक्षेचे उपाय स्वत:साठी वापरले, त्याच सुविधा कर्मचाऱ्यांना देण्याचा मनाचा मोठेपणा दाखवायला हवा. त्यांच्याही आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे, याचेही भान ठेवायला हवे. तरच स्वच्छता अभियान आणि त्यांचे रोज चालणारे अभियान गतीने अन् तेवढ्याच जबाबदारीने पार पडून, पाच वर्षांपूर्वी राज्यातील स्वच्छ शहर म्हणून मिळविलेल्या पुरस्कारातून उतराई झाल्यासारखे होईल.
इस्लामपूर शहरात सफाई कामगार कोणत्याही सुविधांशिवाय दररोज सफाई करताना दिसतात. दुसऱ्या छायाचित्रात अधिकारी, पदाधिकारी मात्र हँडग्लोज, गमबूट व मास्क लावून स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत.