राजगुरुनगरला लवकरच शुद्ध पाणी

By Admin | Updated: July 20, 2016 01:00 IST2016-07-20T01:00:18+5:302016-07-20T01:00:18+5:30

केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले

Clean water soon to Rajgurunagar | राजगुरुनगरला लवकरच शुद्ध पाणी

राजगुरुनगरला लवकरच शुद्ध पाणी


राजगुरुनगर : येथील भीमा नदीवरील केदारेश्वर बंधाऱ्यात सांडपाणी येऊ नये म्हणून त्याला बायपास करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या सिमेंट पाइपलाइनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, जलशुद्धीकरण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत बिडाची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे थोड्याच दिवसांत सांडपाण्याचा अंश नसलेले शुद्ध पाणी राजगुरुनगरला मिळणार आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेने नुकतेच जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण करून शुद्ध पाणी गावाला देण्यास सुरुवात केलेली आहे. पण केंद्रापासून पाण्याच्या टाकीपर्यंत हे पाणी वाहून नेणारी जुनी पाइपलाइन सतत फुटत होती. त्यामुळे पुरेसे शुद्ध पाणी गावाला मिळत नव्हते. तसेच सांडपाणी बंधाऱ्यात येत असल्याने त्याचाही काही अंश पाण्यात राहत होता. आता या दोन्ही समस्या सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांना खऱ्या अर्थाने शुद्ध पाणी मिळणार आहे. राजगुरुनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यात येणारे सांडपाणी थांबविण्याचा निर्णय राजगुरुनगर नगर परिषदेने मे महिन्यात घेतला होता. त्यानुसार हे पाणी बाजूने काढून देण्याच्या कामासाठी ३१ लाखांची निविदा मंजूर झाली होती. प्रत्यक्ष कामाला सुरुवातही मे महिन्यात झाली. राजगुरुनगरच्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाणी गावाच्या पाणीयोजनेसाठी वापरले जाते. या बंधाऱ्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे ते नेहमीच खराब होत होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून राजगुरुनगरकर दूषित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त होते. पावसाळ्यात गढूळ पाणी आणि उन्हाळ्यात वास मारणारे काळपट पाणी अशी अवस्था होती. पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण बंधाऱ्यात येणारे सांडपाणी होते. हे कारणच समूळ नष्ट करण्यासाठी, ज्या झुरीतून गृहप्रकल्पांचे पाणी केदारेश्वर बंधाऱ्यात येते, तो प्रवाह बंधाऱ्याच्या बाजूने मोठे पाइप टाकून बंधाऱ्यापुढे आणून सोडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Clean water soon to Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.