स्वच्छ मुंबई अभियान

By Admin | Updated: March 2, 2017 02:07 IST2017-03-02T02:07:26+5:302017-03-02T02:07:26+5:30

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली गेली.

Clean Mumbai campaign | स्वच्छ मुंबई अभियान

स्वच्छ मुंबई अभियान


मुंबई : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवली गेली. हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर प्रामुख्याने कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली इ. राज्यात १४८ शहरांमध्ये सुमारे १,४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २७२० कि. मी. लांबीचे शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, बस स्थानके, रुग्णालये येथे राबविण्यात आले.
या अभियानासाठी प्रतिष्ठानातर्फे संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्याबाबत विनंती पत्रे दिली गेली. मुंबईतील महालक्ष्मी येथील आनंद निकेतन संस्था आणि परळ येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात २ हजारांहून अधिक सदस्य व नागरिक यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
या वेळी अधिष्ठाता डॉ. ए. एम पातुरकर यांनी सांगितले की, १३० वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या या विद्यालयात १ मार्च रोजी डॉ. नानासाहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. १५ एकरच्या या परिसराचा २ हजारांहून अधिक सदस्यांनी दीड तास स्वच्छता करून कायापालट केला.
पश्चिम उपनगरात सांताक्रुझ ते दहिसर या विभागात प्रतिष्ठानच्या वतीने राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडोशी येथील नागरी निवारा परिषद क्रमांक ५ व ६ येथील अपना बाजार जंक्शन येथे या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ४०मधील शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सुहास वाडकर आणि शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रभाग क्रमांक ४१चे अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला़ या वेळी प्रभाग शाखाप्रमुख संदीप जाधव, नारायण पाटील आणि येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांताक्रुझ ते दहिसरदरम्यान, सरकारी कार्यालयात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत एकूण सरकारी कार्यालय ५६, एकूण मनुष्य बळ २,५५१, सफाई केलेले एकूण क्षेत्रफळ ३९९२४२.५३, एकूण जमा झालेला कचरा १५.२८५८ टन, तर रस्त्यावर केलेल्या साफसफाईत एकूण रस्त्यांची संख्या ३३७, रस्त्याची एकूण लांबी ४४२.३१, एकूण ३४.६९८ टन इतका कचरा रस्त्यावर जमा झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Clean Mumbai campaign