आघाडीची घाण स्वच्छ करा
By Admin | Updated: October 10, 2014 22:57 IST2014-10-10T22:00:38+5:302014-10-10T22:57:35+5:30
देवेंद्र फडणवीस : चिखलीत भाजपची प्रचारसभा

आघाडीची घाण स्वच्छ करा
गुहागर : भारत स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक भारतीय सहभागी झाला पाहिजे. यासाठी सर्व राज्ये स्वच्छ झाली पाहिजेत. महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची घाण स्वच्छ करावी लागेल, असे प्रतिपादन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. -भाजपचे उमेदवार डॉ. विनय नातू यांच्या प्रचारार्थ चिखली येथील सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश प्रगतीच्या वाटेवर आहे. मोदींनी चीन, अमेरिका, जपान दौरे केले. याआधी अमेरिकेच्या आदेशावर पंतप्रधान मान डोलवायचे. मोदी अमेरिकेमध्ये याचक म्हणून नाही तर शासक म्हणून गेले. अमेरिकेत जाऊन ते केवळ भारताचे नाहीत जगाचे नेते आहेत, असा उल्लेख तेथील प्रसार माध्यमातून झाला.
काँग्रेस जाहिरातीतून महाराष्ट्र पहिला असल्याचे सांगत आहे, पण मागून की पुढून हे विचारण्याची गरज आहे. कारण सर्वाधिक ७ हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. सर्वाधिक महिलांवर बलात्कार, अत्याचार महाराष्ट्रात होतात. ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्रावर आहे. ७० हजार कोटी खर्चून एक टक्का ही सिंचन क्षमता वाढली नाही. एवढे पैसे खर्चूनही कोणताच विकास झाला नाही मग हा पैसा गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी केला.
महाराष्ट्रातील ५० टक्के तरुण २५ वर्षाच्या आतील आहेत. शिक्षण व्यवस्था कमकुवत आहे. देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असताना या तरुणांना दर्जात्मक शिक्षणाारोार कौश"य देणे ही आवश्यक आहे. अन्यथा समोर रोजगार असूनही त्यासाठी आवश्यक पात्रता तरुणांमध्ये नसेल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावर भाजपने लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी सांगितले. १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळचे किती कार्यकर्ते आजच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, असा सवाल विनय नातूंनी विचारला. आघाडी सरकारच्या १०२ घोटाळ्यानंतर येथील घरेलू कामगार योजनेचा १०३ वा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)