कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना
By Admin | Updated: July 23, 2016 02:16 IST2016-07-23T02:16:00+5:302016-07-23T02:16:00+5:30
अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे.

कलंकित मंत्र्यासाठी ‘क्लीन चिट’ योजना
मुंबई : अवघ्या २० महिन्यांत २० मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात फसले असून, सरकारने विश्वासार्हता गमावली आहे. भ्रष्ट मंत्र्याना वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट एक खिडकी योजना’ आणि ‘गुन्हे माफ योजना’ सुरू करावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी फडणवीस सरकारचा समाचार घेतला.
राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात विरोधी पक्षांनी नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला विखे-पाटील यांनी सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी अनेक मंत्र्यांवर पुराव्यांसह थेट आरोप केले. आरोग्य राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच दलित समाजाबद्दल डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच अवमानजनक विधान केले होते. जातीवाचक अपशब्द वापरल्याबद्दल यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. नाशिकपासून नेरूळपर्यंत पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चव्हाणांची नेमकी कोणती कामगिरी पाहून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, अशी विचारणा विखे यांनी केली. पर्यटन मंत्री जयकुमार रावल, कामगार मंत्री संभाजीराव पाटील, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर असलेल्या आरोपांची जंत्रीच विखे यांनी यावेळी सादर केली.
एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांच्या चौकशीत मूलभूत प्रश्नांची उत्तरेच मिळालेली नाहीत. तरीही त्यांना क्लीन चिट दिल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप घेतला. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या काळातील औषध खरेदी घोटाळ्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, आरोग्य मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळून त्यांच्या खासगी सचिवापासून चालकापर्यंत संपूर्ण कर्मचारीवर्ग त्यांना सोडून गेला आहे. यासोबतच त्यांनी इतरही अनेक मंत्र्यांच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून, असेच सुरू राहिल्यास मंत्र्यांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील कागदपत्रांच्या प्रदर्शनासाठी गांधी भवन सभागृहाऐवजी पुढील वेळी ते वानखेडे स्टेडियमवर हे प्रदर्शन भरवावे लागेल, असा सूचक इशारा विखे पाटील यांनी दिला. (प्रतिनिधी)
>निकष काय आहेत?
गेल्या दोन वर्षांत मंत्रिमंडळात समावेश करताना निकष काय आहे? जास्त बदनामी हा आहे की की ओरिजनल असणे, हे आधी स्पष्ट करायला हवे. ओरिजनलवर कितीही आरोप झाले, भ्रष्टाचार केला, तरीही त्याची वर्णी लावली जात आहे. यामुळे आमच्यातून तिकडे गेलेल्या विजय गावित, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांचा मंत्रिमंडळात नंबर लागला नाही. मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांना असा धक्का दिला जातो की ते थेट चौथ्या रांगेत जातात, असे खडसे यांच्याकडे पाहात जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर सभागृहात एकच हशा पिकला.