निकालापूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 12, 2017 16:58 IST2017-06-12T16:58:38+5:302017-06-12T16:58:38+5:30
येथील पाटीलनगर भागात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

निकालापूर्वीच दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क:
सिडको : येथील पाटीलनगर भागात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने निकाल लागण्यापूर्वीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, कालिका पार्क, पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर हे गेल्या २० वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ (१५) हा तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता व त्याने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दहावीचा निकाल अद्याप लागला नसून त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती. आज दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, रविवारी (दि.११) कौस्तुभ व त्याचे आई-वडील रात्री उशिरापर्यंत घरात गप्पा मारत बसले होते. यानंतर सर्व झोपल्यानंतर कौस्तुभने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे पहाटे चार वाजता उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. कौस्तुभच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.