शहरात रिपरिप; उपनगरात जोरदार, झाडांची पडझड सुरूच!
By Admin | Updated: June 22, 2015 05:11 IST2015-06-22T05:11:08+5:302015-06-22T05:11:08+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने रविवारी आपला वेग कायम ठेवला आणि तिसऱ्या दिवशीही मुंबई ओलिचिंब झाली.

शहरात रिपरिप; उपनगरात जोरदार, झाडांची पडझड सुरूच!
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने रविवारी आपला वेग कायम ठेवला आणि तिसऱ्या दिवशीही मुंबई ओलिचिंब झाली. रविवारी दिवसभर पडलेल्या जलधारांमुळे कुलाबा आणि सांताक्रुझ या वेधशाळांत अनुक्रमे ६६.८, १३०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासांमध्ये मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दिवसभरात शहरात ४, पूर्व उपनगरात ५ आणि पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण १५ ठिकाणी घरांचा/भिंतींचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.
शनिवारी विलेपार्ले येथे ओल्ड कपोल बँकेच्या बाजूला स्लॅब पडून जागृती गांधी ही महिला जखमी झाली. तर शनिवारी मध्यरात्री वांद्रे पूर्वेकडील नेजवान चाळ येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना चौथ्या मजल्याचा काही भाग पडला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर ४ जखमी झाले. यास्मिन शेख (२७) आणि सरिना शेख (१३) अशी मृतांची नावे आहेत, तर जखमींमध्ये बिल्कीश अली, जिब्रान शेख, हरिदा शेख, इश्रायत कुरेशी यांचा समावेश आहे. सांताक्रुझ पूर्वेकडे शनिवारी झाड पडून अजय मुंठन (३५) या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, खार पश्चिमेकडील नाल्यात पडलेल्या कंत्राटी कामगारांचा अद्याप शोध लागलेला नाही. भांडुप पश्चिमेकडील हनुमान टेकडी येथे दरडीचा भाग कोसळण्याची घटना घडली असून, शहरात १२, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात ३ अशा एकूण १६ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात ३०, पूर्व उपनगरात २० आणि पश्चिम उपनगरात ३५ अशा एकूण ८५ ठिकाणी झाडे पडली.
मुंबई शहरात हिंदमाता, सायन रोड क्रमांक २, किंग्ज सर्कल, दादर टीटी, पूर्व उपनगरात साकीनाका येथील ९० फीट रोड, कुर्ला स्टेशन रोड, पश्चिम उपनगरात वांद्रे येथील कार्टर रोड, जुहूमधील मोरागाव, सांताक्रुझमधील शिवाजी नगर, गोरेगाव येथील डोंगरी, मालाड-मालवणी, खार पश्चिमेकडील १८वा रस्ता इ. ३५ ठिकाणी पाणी साचले. उदंचन संच आणि मनुष्यबळाचा वापर करून येथील पाण्याचा निचरा करण्यात आला. (प्रतिनिधी)