विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
By Admin | Updated: July 4, 2016 01:20 IST2016-07-04T01:20:35+5:302016-07-04T01:20:35+5:30
भारनियमन सुरू असतानाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या विजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.
_ns.jpg)
विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण
चंदननगर : उन्हाळ्यात खराडी-चंदननगर-वडगावशेरी भागात महावितरणचे अघोषित भारनियमन सुरू असतानाच आता पावसाळ्यातही येथील अनेक भागांवर सतत जाणाऱ्या विजेमुळे हैराण होण्याची वेळ आली आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री-अपरात्रीदेखील वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिक व नगरसेवक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महावितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महावितरणने प्रभाग क्रमांक १८ सोडून इतर सर्व म्हणजे प्रभाग २, ३, १९ येथील अनेक भागांत, भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम अर्धवटच सोडले आहे. वडगावशेरी मतदारसंघात १०० कोटींचा निधी मंजूर करून तीन वर्षे उलटली, तरीही अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेत आहेत. उन्हाळ्यात अघोषित भारनियमानाने हैराण झालेल्या खराडी-चंदननगरकरांना आता पावसाळ्यातही विजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत आहे. मागील सहा-सात महिन्यांपासून खराडी- चंदननगरच्या तुळजाभवानीनगर, राजाराम पाटील नगर, पाटीलबुवानगर, खराडीगाव, चौधरीवस्ती, चंदननगर बाजार परिसर, बोराटेवस्ती, वडगावशेरी गणेशनगर, सोमनाथनगर, आनंदपार्क आदी भागातील आदी भागांना वारंवार वीजपुरवठा खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून परिसरातील नगरसेवकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला.
खराडीतील महावितरण केंद्र व शास्त्रीनगर येथील केंद्रावर नगरसेवक महेंद्र पठारे व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली; मात्र अधिकारी काहीच करत नसल्याने नगरसेवकांसह नागरिक हवालदिल झाले आहेत. (वार्ताहर)
>तारा टेकल्या जमिनीला
तुळजाभवानीनगर येथील वीज गायब असून, अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तर दुसरीकडे खराडीतील थिटेवस्ती येथे विजेच्या तारा अगदी जमिनीला टेकायला लागल्या, तरी महावितरण अधिकारी लक्ष देत नाहीत. भूमिगत वाहिन्या टाकण्याच्या कामाला निधी दोन वर्षांपासून निधी पडून असूनदेखील अधिकारी का काम करत नाही, असा सवाल नागरिकांना पडला आहे.
मी याभागात येऊन वीस दिवस झाले असून, परिसरातील समस्यांची माहिती घेत आहे. प्रत्यक्ष पाहणी करून विजेचा प्रश्न सोडविणार आहे.
-किशोर पाटील, मुख्यअभियंता विद्युत विभाग, नगर रस्ता