नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची
By Admin | Updated: March 6, 2017 04:10 IST2017-03-06T04:10:15+5:302017-03-06T04:10:15+5:30
महापालिकेला नागरिकांकडून कररुपाने चांगल्याप्रकारे निधी मिळतो

नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची
ठाणे : महापालिकेला नागरिकांकडून कररुपाने चांगल्याप्रकारे निधी मिळतो. नागरिक जसे कर देऊन आपले कर्तव्य बजावतात. तसेच कर्तव्य पालिकेनेही नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन बजावले पाहिजे. त्यासाठी परिणामकारक योजना राबविल्या पाहिजेत, असे मत ठाण्याचे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच महापालिकेचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी काशीनाथ कचरे आणि निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजा तांबट यांनी व्यक्त केले.
नागरिकांच्या सूचना समजावून घेऊन त्याचा समावेश ठाणे महापालिका अर्थसंकल्पात करणार असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांसह निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले. यात शहरातील चौकाचौकात क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) योग्य ठिकाणी लावल्यास त्याचा चांगला परिणाम होईल. मार्केट, शाळा, महाविद्यालये, बँक आणि एटीएम केंद्राचे परिसर, मुख्य रस्ते, चौक जंक्शन, पादचारी पूल, रेल्वे आणि बस स्थानकांव्यतिरिक्त ओसाड जागीही सीसीटीव्ही असल्यास ते उपयुक्त ठरतील. त्यातून वाहन चोरी, महिलांची छेडछाड, खून, हाणामारीच्या प्रकारांवर नजर ठेवणे पोलिसांबरोबर पालिका प्रशासनालाही सोपे जाणार असल्याचे कचरे म्हणाले.
एकदा लावलेल्या सीसीटीव्हींकडे पुन्हा लक्ष दिले जात नाही. तसे न होता, त्यांची देखभाल आणि त्यातून होणारी टेहळणी व्यवस्थित होते की नाही? याचा आढावाही पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी घेणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्हीतील संशयास्पद हालचालींची माहिती पालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पोलिसांना दिली गेली पाहिजे. डीव्हीआर आणि त्यासंबंधीच्या साधनसामुग्रीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती आवश्यक आहे. त्यातून शहरातील कोणत्याही भागात करडी नजर ठेवणे पालिका यंत्रणेलाही सोपे जाईल, असा दावा त्यांनी केला.
शहरातील रस्त्यांवर मोकळेपणाने चालणे, हा नागरिकांचा अधिकार आहे. हा हक्क अबाधित राहण्यासाठी फेरीवाल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. यासाठी ‘ना फेरीवाला क्षेत्रा’ची काटेकार अंमलबजावणी झाल्यास रस्ते बऱ्यापैकी मोकळे होतील. त्यावर नियंत्रणासाठी अतिक्रमण विरोधी पथकासारखे स्वतंत्र पथक तयार करुन तिथे आवश्यक तो निधी खर्च करता येईल, अशी सूचना त्यांनी केली.
नागरिकांत मिसळून काम व्हावे
जातीय आणि धार्मिक मुद्दयांवर दंगली होऊ नयेत म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात मोहल्ला आणि शांतता कमिटी आहे. काही संभाव्य घटनाही त्यातून टाळता येतात. त्याच धर्तीवर पालिका प्रशासनानेही शांतता कमिट्यांची स्थापना करावी. सुरक्षेविषयी पालिका अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी. पोलीस ज्याप्रमाणे नागरिकांमध्ये मिसळून काम करतात. त्याचप्रमाणे कर गोळा करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांनीही सुरक्षिततेविषयी सोसायटी स्तरावर बैठका घेऊन कामे करावीत, असे कचरे म्हणाले.
आगीपासून सुरक्षा
प्रत्येक गृहसंकुलांमध्ये अग्निप्रतिबंधक अवजारे आणि जलवाहिनी लावलेली असते. यासाठी पालिकेच्या अग्निशमन विभागाने सोसायट्यांमध्ये तसेच मोठया हॉटेलांमध्ये जाऊन नियमित प्रात्यक्षिक देणे आवश्यक आहे. याबाबत प्रभाग अधिकारी स्तरावर सोसायटयांमध्ये अचानक पाहणी झाली पाहिजे, असा मुद्दा त्यांनी मांडला. (प्रतिनिधी)
>‘सोसायट्यांची, उद्यानांची सुरक्षा तपासावी’