शहरे झाली स्वच्छ, सुंदर !
By Admin | Updated: March 2, 2017 03:01 IST2017-03-02T03:01:42+5:302017-03-02T03:01:42+5:30
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शहरे झाली स्वच्छ, सुंदर !
कर्जत : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यासाठी नागरिकांनीही सहभागी होत उत्तम प्रतिसाद दिला. कर्जत नगरपरिषदेच्या सहकार्याने कर्जत शहरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत सुमारे बाराशे श्रीसदस्यांनी कर्जत शहराची स्वच्छता करून शहर चकाचक केले.
कर्जत येथील टिळक चौकात कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या हस्ते गणपती आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कर्जत तालुक्यातील सुमारे आठ हजार श्री सदस्य या स्वच्छता अभियानात उतरले होते.
या वेळी उपसभापती मनोहर थोरवे, कर्जत नगर परिषदेचे गटनेते राजेश लाड, नगरसेविका सुवर्णा जोशी, अश्विनी दिघे, अर्चना बैलमारे, पुष्पा दगडे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, अशोक ओसवाल, मिलिंद चिखलकर आदींसह श्री सदस्य उपस्थित होते.
श्री सदस्यांनी कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ स्वच्छ करायला घेतली. या स्वच्छता मोहिमेत आमदार सुरेश लाड सुध्दा सहभागी झाले होते. नगरपरिषदेच्या हद्दीतील कर्जत, मुद्रे बुद्रुक, मुद्रे खुर्द, संपूर्ण दहिवली, भिसेगाव, गुंडगे व आकुर्ले या गावांतील गल्ली - बोळांसह रस्ते झाडून चकाचक केले. हे काम श्री सदस्यांनी बुधवारी १ मार्च रोजी केले.
सकाळी लवकर स्वच्छता मोहिमेला सुरु वात करून दुपारपर्यंत कर्जत नगरपरिषद हद्दीतील रस्ते चकाचक झाले होते. रस्त्याच्या बाजूला वाढलेली झाडे कापली गेली होती, रस्त्यावर झाडू मारून गोळा झालेला कचरा गोळा करू गाडीत भरला गेला होता, गटाराच्या बाजूला डीडीटी पावडर टाकली होती.
या स्वच्छता मोहिमेमध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि छोटे धंदे करणाऱ्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. सार्वजनिक ठिकाणांवर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते अशी ठिकाणे म्हणजे कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालय, न्यायालयाचे आवार, प्रांत कार्यालय, एसटी आगार, वनविभाग कार्यालय अशा ठिकाणीही श्री सदस्यांनी स्वच्छता केली.
श्री सदस्यांसह या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोेंदविला होता. (वार्ताहर)
>मुरुडमध्ये ८० टन कचरा गोळा
नांदगाव/मुरुड : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान मोहिमेअंतर्गत संपूर्ण भारतात १ मार्च रोजी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
महाराष्ट्रासह असंख्य राज्ये या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाली आहेत. शहरालगत असणारी मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस आलेली झाडेझुडपे साफसफाई करण्यात आली. सर्व गोळा होणारा कचरा डम्पिंग ग्राऊंडला नेण्यात येणार असून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाणार आहे.
मुरु ड तालुक्यात सुद्धा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ११५० श्री सदस्यांनी सहभाग घेऊन तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील कचरा साफ केला. यावेळी ८० टन कचरा गोळा करु न त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
>कर्जतमध्ये एक हजार टन कचऱ्याची विल्हेवाट
नेरळ : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार, १ मार्च रोजी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील अनेक ठिकाणी सदस्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानांतर्गत कर्जत तालुक्यात सुमारे एक लाख टन कचरा संकलित करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. कर्जत तालुक्यातील कर्जत, कशेळे, पोशीर, नेरळ, कळंब, खांडस, चिंचवली, जुमापट्टी, दस्तुरी, माथेरान, डिकसळ, धामोते, तळवडे, अशा अनेक ठिकाणी श्री सदस्यांनी झाडू, घमेली, फावडे घेऊन मुख्य रस्ते, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर व अन्य ठिकाणातील सरकारी कार्यालय परिसराची स्वच्छता केली. परिसरात जमा झालेला सर्व कचरा ट्रॅक्टरच्या साह्याने गावाबाहेरील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आला.
>आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची- सचिन धर्माधिकारी
प्रतिष्ठानमार्फत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा, केरळ, तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी राज्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. १४८ शहरे, १४३४ सरकारी कार्यालये, ११५ रेल्वे स्थानके व सुमारे २७२० कि. मी. लांबीचा रस्ता स्वच्छ करण्यात आला.
रेवदंडा : आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरुवात केल्यास स्वच्छता अभियान राबवावे लागणार नाही, असे मार्गदर्शक विचार निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी रेवदंडा पारनाका येथे काढले.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेबुधवारी स्वच्छता अभियान देशभर राबविण्यात आले. त्याचा शुभारंभ पारनाका येथे करण्यात आला. त्याप्रसंगी वरील विचार निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, स्वच्छता प्रत्येकाने अंगीकारल्यास सरकारवर या गोष्टीचा ताण येणार नाहीच, शिवाय आपला परिसर स्वच्छ असेल तर रोगराई होणार नाही याकडे लक्ष वेधून प्रत्येक नागरिकाने स्वच्छता ठेवणे हे कर्तव्य समजावे, असे आवाहन प्रतिष्ठानमार्फत के ले.
>मुरुडमधील रेवदंडा येथे शुभारंभ
मुरुड तालुक्यात उदय दांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सदस्यांनी संपूर्ण स्वच्छता मोहीम यशस्वी पार पाडली. या स्वच्छता मोहिमेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू साफ झाल्यापासून सर्वत्र स्वच्छतेच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत.
संपूर्णमहाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. रेवदंडा येथे अभियानाचा शुभारंभ उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी, धर्माधिकारी कुटुंबीय, दास मंडळी आदींच्या उपस्थितीत झाला.