सिनेमा, मॉलमध्ये गर्दी करणाऱ्यांनी झळ सोसावी!
By Admin | Updated: October 1, 2015 03:17 IST2015-10-01T03:17:28+5:302015-10-01T03:17:28+5:30
एकीकडे राज्यातल्या काही भागात दुष्काळ आहे. लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत तर दुसरीकडे सिनेमा, मॉलमध्ये गर्दी दिसते.

सिनेमा, मॉलमध्ये गर्दी करणाऱ्यांनी झळ सोसावी!
अतुल कुलकर्णी, मुंबई
एकीकडे राज्यातल्या काही भागात दुष्काळ आहे. लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत तर दुसरीकडे सिनेमा, मॉलमध्ये गर्दी दिसते. त्यामुळे अशा वर्गावर दुष्ळाळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून तात्पुरत्या स्वरूपातला अधिभार लावा, अशी सूचना महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.
बाहुबलीसारख्या सिनेमाने ५०० कोटींचा गल्ला जमवला. अनेक चित्रपट १०० कोटींचा गल्ला अवघ्या चार दिवसांत गोळा करतात. लोक अशा चित्रपटांना गर्दी करतात म्हणूनच हे शक्य होते. त्यामुळे चित्रपट तिकिटांवर फार नाही तर किमान १० रुपये जादा अधिभार आकारून लक्झरी गोष्टींवर सुद्धा असा अधिभार लावावा. तसेच तीन व पाच तारांकित हॉटेलांत जाणाऱ्यांवर काही काळासाठी कर लावा, आदी सूचना आपण केल्याचे खडसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मध्यंतरी ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासाठी सलमान खानची बहीण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान आपल्याकडे आले होते. त्यांनी चित्रपट करमुक्त करा आणि जेवढा कर सरकारला मिळणार होता तेवढी रक्कम आम्ही मुख्यमंत्री निधीला धनादेशाद्वारे देऊ, असा प्रस्ताव दिला होता. असे करण्याचे कारण काय, असेही त्यांना आपण विचारले होते तेव्हा आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी आपण हे करीत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. मात्र त्याच काळात सलमान खानने याकूब मेननच्या बाबतीत वादग्रस्त विधान केले आणि त्याचा चित्रपट सरकार टॅक्स फ्री करीत असल्याचे सांगत वादंग उभे केले गेले. परिणामी मुख्यमंत्री निधीत काही कोटी रुपयांची भर पडण्याची राहिली, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.
विदेशी मद्यावर जास्तीचा कर लावला तर शेजारील राज्यातून तस्करी होऊ शकते किंवा हातभट्टीच्या दारूकडे लोक वळतात. अशा मद्याच्या किमती आटोक्यात येतात त्यावेळी विक्री वाढते. याचा अर्थ लोक दारू जास्त पितात असे नाही तर हातभट्टीची दारू लोक पित नाहीत, असे गणितही खडसे यांनी मांडले.