सिलिंडरची घरपोच सेवा बंद
By Admin | Updated: June 8, 2016 01:59 IST2016-06-08T01:59:50+5:302016-06-08T01:59:50+5:30
करावे गाव व सीवूड सेक्टर ४६ परिसरामध्ये इंडेन गॅसचे वितरक ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत नाहीत.

सिलिंडरची घरपोच सेवा बंद
नवी मुंबई : करावे गाव व सीवूड सेक्टर ४६ परिसरामध्ये इंडेन गॅसचे वितरक ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत नाहीत. नेरूळ स्टेशनमधील कार्यालयात जावून सिलिंडर घ्यावा लागत असून, घरी घेवून जाण्यासाठी रिक्षाला ६० रुपये मोजावे लागत आहेत. तक्रारी करूनही एजन्सी चालक याकडे दुर्लक्ष करत आहेत.
सीवूड सेक्टर ४६ मधील साईकृपा सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे किरण ढेबे यांनी दोन वर्षांपूर्वी इंडेन गॅसकडे (ग्राहक क्रमांक ७५६५) नोंदणी केली आहे. एजन्सीचे कार्यालय नेरूळ स्टेशनच्या इमारतीमध्ये असून सेक्टर ४६ पासून हे अंतर जवळपास तीन किलोमीटर आहे. सिलिंडर संपल्यानंतर त्याची आॅनलाइन नोंदणी केली जाते. परंतु नोंदणी केल्यानंतर सिलिंडर घरापर्यंत पोहचविला जात नाही. दोन वर्षापासून ते स्वत:च एजन्सीच्या कार्यालयातून सिलिंडर घेवून जात आहेत.
करावे गाव व परिसरातील बहुतांश नागरिकांना नेरूळमध्ये येवून स्वत: सिलिंडर घेवून जावे लागत आहे. नेरूळमधून रिक्षा चालक सीवूडला येत नाहीत. तेथे जायचे असेल तर रिक्षाचालक सांगतील तेवढे पैसे द्यावे लागत आहेत. किमान ५० ते ६० रुपये द्यावे लागत आहेत. विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
नागरिकांमध्ये असंतोष
सिलिंडर घरापर्यंत पोहचविण्याची मागणी ग्राहकांनी वारंवार केली आहे. परंतु एजन्सी चालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. एजन्सी चालकाकडे तक्रारवही मागितल्यानंतर तीही दिली जात नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला असून आंदोलन करण्याचा पवित्रा अनेक नागरिकांनी घेतला आहे.