सिडकोचा नवा गृहप्रकल्प नव्या वर्षात
By Admin | Updated: October 20, 2016 03:07 IST2016-10-20T03:07:21+5:302016-10-20T03:07:21+5:30
सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे.

सिडकोचा नवा गृहप्रकल्प नव्या वर्षात
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. साधारण जानेवारी २0१७ पासून या गृहप्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे सिडकोने अलीकडेच आपल्या विविध प्रकल्पातील शिल्लक घरे विक्रीला काढली आहेत. त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नव्या वर्षात येवू घातलेल्या गृहप्रकल्पालाही भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे.
सिडकोने यापूर्वी विविध घटकांसाठी साधारण दीड लाख घरे बांधली आहेत. डिसेंबर २0१९ पर्यंत आणखी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने व्यक्त केला आहे. त्यापैकी खारघर येथे स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प आणि उलवे येथे या प्रकल्पाअंतर्गत तीन हजार ६00 घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित ५१ हजार ४00 घरांची टप्प्याटप्प्याने निर्मिती करण्याचे सिडकोची योजना आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळोजा येथे १३,८१0 घरांचा मेगा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २ हजार ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी निविदासुध्दा मागविण्यात आल्या असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २0१७ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. या प्रकल्पातील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ३0८ चौरस फूट आणि ३७0 चौरस फूट असे असणार आहे.
येत्या काळात सर्वसामान्यांना बजेटमधील घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार २0१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने बाळगले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ३८,३१७ घरांची निर्मिती करण्याची योजना आहे. त्याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. ही घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
>शिल्लक घरांनाही मागणी
खासगी विकासकांपेक्षा ग्राहकांची सिडकोच्या घरांना नेहमीच प्रथम पसंती राहिली आहे. त्यामुळे सिडकोने एखादा गृहप्रकल्प जाहीर केला की, ग्राहकांच्या त्यावर उड्या पडतात. सध्या सिडकोने आपल्या विविध गृहप्रकल्पांतील ३८0 शिल्लक घरे विक्रीला काढली आहेत. त्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच नव्या वर्षात सिडकोचा नवा गृहप्रकल्प येत असल्याने बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना घर घेण्याची आणखी एक संधी प्राप्त होणार आहे.