देवस्थान समित्यांची सीआयडी चौकशी
By Admin | Updated: April 9, 2015 02:55 IST2015-04-09T02:55:55+5:302015-04-09T02:55:55+5:30
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील देवस्थान व्यवस्थापन समित्यांच्या कारभाराची चौकशी सीआयडीच्या विशेष पथकामार्फत केली जाईल

देवस्थान समित्यांची सीआयडी चौकशी
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील देवस्थान व्यवस्थापन समित्यांच्या कारभाराची चौकशी सीआयडीच्या विशेष पथकामार्फत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
अनेक देवस्थान समित्यांनी लेखा परिक्षण पूर्ण केले नाही. देवस्थानाकडे असलेल्या दागिन्यांची आणि त्यांच्या मुल्याची नोंदी ठेवलेल्या नाहीत, याबाबत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी मांडली होती. देवस्थानाकडे असलेल्या जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत, असे सांगून कोल्हापूरच्या महालक्ष्मी, ज्योतीबासह अनेक देवस्थानांमध्ये कोट्यवधीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप क्षीरसागर यांच्यासह प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील आदी सदस्यांनी केला. कोकणात देवस्थानच्या कुळजमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांनाच त्या द्याव्यात, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली. राज्य सरकारने स्वत: अधिकारी नेमून मंदिराचे कामकाज पाहावे, अशी सूचना काही सदस्यांनी केली असता, मंदिरे चालवणे सरकारचे काम नाही. सार्वजनिक विश्वस्त संस्थेनेच मंदिरांचे काम पाहावे, मात्र विशेष प्रकरणात राज्य सरकार हस्तक्षेप करील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.