MNS Prakash Mahajan News: राज ठाकरे आमचे सेनापती आहेत. मी राज ठाकरेंचा सैनिक आहे. मी त्याच्या एक पाऊल पुढे गेलो आहे. निशिकांत दुबे हिंदी भाषिक आहेत आणि त्यांना समजावे म्हणून हिंदीत बोलतो, निशिकांत दुबेजी, दिन तुम्हारा, मैदान तुम्हारा, वक्त तुम्हारा, कहाँ आऊ ये बताओ, कौन किसको पटक पटक के मारता हैं, ये दुनिया देखेगी, असे सांगत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी थेट भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना आव्हान दिले.
निशिकांत दुबे आव्हान देतो की, मराठी माणसाला आपटून मारेन आणि आमचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. ते १३ कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. बाकी कुणाची हिंमत नाही, हिंमत फक्त मनसैनिक दाखवू शकतो. परप्रांतीय येऊन इथे आमदार होतो आणि तो आम्हाला मराठीचे धडे द्यायला सुरुवात करतो. हे दुर्दैव आहे. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत आहे. मराठी माणसाने तुम्हाला आपलेसे केले आणि तुम्हीच मराठी माणसाला असे बोलता, अशी खंत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली.
आमच्याच राज्यात मराठीची अवहेलना सुरू
आमच्याच राज्यात मराठीची अवहेलना सुरू आहे. कुणीही उठावे आणि मराठीला नावे ठेवावीत. मी मराठी बोलणार नाही, असे छातीठोकपणे सांगतात. तुम्ही इथे राहता. महाराष्ट्राच्या मातीत कावळा हादेखील मराठीत बोलतो. तुम्ही तर माणसे आहात. राज ठाकरे यांची हिंदी निशिकांत दुबे यांच्यापेक्षा चांगली आहे. अरे राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफींकडून मराठीत गाणी गाऊन घेतले आहेत. त्यामुळे तू आम्हाला भाषा शिकवू नको. आमचा भाषेला विरोध नाही, असे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली का? बॉम्बे महाराष्ट्राचा भाग नव्हता, तो गुजरातचा भाग होता. १९५६ मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. परंतु आजही मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ ३१-३२ टक्केच लोक मराठी भाषिक आहेत. तितकेच ३२ टक्के हिंदी भाषिक आहेत. २ टक्के भोजपुरी, १२ टक्के गुजराती, ३ टक्के तेलगु, २ टक्के तामिळ, २ टक्के राजस्थानी, ११-१२ टक्के लोक ऊर्दू भाषिक आहेत, असे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.