पुणेकरांकडून हिरव्या-निळ्या रंगाला पसंती

By Admin | Updated: November 3, 2016 00:29 IST2016-11-03T00:29:24+5:302016-11-03T00:29:24+5:30

बससाठी पुणेकरांनी हिरव्या व निळ्या रंगासह त्यावर रंगीबेरंगी पाने-फुले असलेल्या रंगसंगतीला पसंती दिली आहे.

The choice of green-blue color from Pune | पुणेकरांकडून हिरव्या-निळ्या रंगाला पसंती

पुणेकरांकडून हिरव्या-निळ्या रंगाला पसंती


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बससाठी पुणेकरांनी हिरव्या व निळ्या रंगासह त्यावर रंगीबेरंगी पाने-फुले असलेल्या रंगसंगतीला पसंती दिली आहे. पीएमपीचे संचालक मंडळ व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर या रंगसंगतीवर शिक्कामोर्तब होईल.
पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका व पीएमपीने एकत्रितपणे तब्बल १५५० बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ५५० बस या एसी व अत्याधुनिक असणार आहेत, तर २०० बस या साध्या ३४ सीटच्या असतील, तर ८०० बस साध्या; परंतु मोठ्या आकाराच्या असणार आहेत. एकूण २०० बसपैकी १२० बस पुणे महापालिका, तर ८० बस पिंपरी-चिंंचवड महापालिका खरेदी करणार आहे. पीएमपीकडून कर्जाद्वारे ८०० बसची खरेदी केली जाणार आहे. तर ५५० बस या असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (एएसआरटीयू) या दिल्लीस्थित संस्थेकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत.
सध्या पीएमपीच्या ताफ्यात लाल रंगाच्या बस आहेत, तर ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत मिळालेल्या बसचा रंग पांढरा-गुलाबी असा आहे. ताफ्यात नव्याने येणाऱ्या बससाठी यापेक्षा वेगळा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तीन रंगसंगतीचे पर्याय तयार करण्यात आले होते. रेनबो इंद्रधनुष्य बस म्हणजे, बीआरटी मार्ग आणि रेनबो इंद्रधनुष्य लिंक बस म्हणजे, बीआरटी वगळता इतर मार्गांवर धावणाऱ्या बससाठीही ही रंगसंगती वेगळी ठेवण्यात आली. या पर्यायांवर पुणेकरांकडून मतदान घेण्यात आले. दि. ५ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत एका टोल फ्री क्रमांकावर पर्यायानुसार ‘मिस कॉल’ देण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले होते. त्यानुसार या कालावधीत पुणेकरांनी दुसऱ्या पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. बीआरटी मार्गासाठी हिरवा व इतर मार्गांसाठी निळा रंग दुसऱ्या पर्यायात देण्यात आला होता. त्यानुसार या पर्यायाची रंगसंगती असलेल्या बस शहरातील रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे.
।पुणेकरांनी दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. त्यानुसार ही रंगसंगतीला पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेतली जाईल. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविली जाईल. प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर, ही रंगसंगती बससाठी अंतिम केली जाईल.
- डी. पी. मोरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Web Title: The choice of green-blue color from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.