लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: शहरातील टेमघर येथील भिवंडी,ठाणे,मीरा भाईंदर मनपाच्या संयुक्तिक स्टेम वॉटर प्लांट येथे क्लोरीन वायूगळती झाल्याची घटना मध्यरात्री घडली होती.या वायू गळतीमुळे येथील पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली होती. वायूगळतीची माहिती मिळताच भिवंडी मनपा अधिकारी व अग्निशमन दल, मुख्य आपातकालीन कक्षातील कर्मचारी, सुरक्षा अधिकारी तसेच शांतीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.या दुर्घटनेत पाच कर्मचारी बाधित झाले असून त्यात वॉचमन अखिलेश मिश्रा, केमिस्ट फिल्टर प्रकाश पाटील, हेल्पर ऋषिकेश म्हात्रे, फिल्टर हेल्पर विपुल चौधरी व पीएसई हेल्पर जयवंत चौधरी यांचा समावेश आहे.तसेच शेजारील इमारतीमधील काही लोक बाधित झाल्याची घटना घडली आहे. या बाधित कर्मचाऱ्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यातील तीन कर्मचाऱ्यांना उपचार करून घरी सोडण्यात आले असून दोघांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरक्षेच्या कारणासाठी आसपासचा परिसर देखील खाली करण्याच्या सूचना देण्यात आली होत्या मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडून वायू गळती तत्काळ थांबवण्यात आल्याने पुढील धोका टळला आहे.घटनास्थळी रहदारी थांबवण्यासाठी सुरक्षा पट्टी बांधण्यात आली होती व सध्या अग्निशमन जवानांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे .
शहरातील टेमघर येथे भिवंडी , ठाणे , मीराभाईंदर मनपाचे स्टेम प्राधिकरणाचे सयुक्तीक प्लांट असून येथे रात्री वायू गळती झाल्याने पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली होती.यापैकी तीन जणांवर उपचार करून रात्रीच घरी सोडण्यात आले असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.वायू गळती रात्रीच नियंत्रणात आणण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली आहे.