Maharashtra Budget Session News: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड हे हातात बेड्या घालून विधानभवन परिसरात आले. अशा पद्धतीने विधानभवनात आलेल्या आव्हाडांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी जितेंद्र आव्हाडांचा फोटो पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'राज्यात आणि देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी होत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी मी हातात बेड्या घालून आलोय', असे जितेंद्र आव्हाड विधानभवनात माध्यमांशी बोलताना म्हणाले.
'देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवा'
जितेंद्र आव्हाड हातकड्या घालून आल्याने विधानभवनात याची चांगलीच चर्चा रंगली. जितेंद्र आव्हाड यांचा हातातील हातकडी दाखवतानाचा फोटो भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री कार्यालयाचा उल्लेख करत चित्रा वाघ यांनी म्हटले की, 'देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवा. देवाभाऊ, यांचे डोहाळे पुरवाचं.'
चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची मागणी केल्याची चर्चा या पोस्टनंतर सुरू झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे हातकड्या घालून आलेले व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
हातकडी घालून आलेले आव्हाड काय काय बोलले?
आव्हाड म्हणालेलेे की, "महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडले जात आहे. व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत."
"या बेड्या या अत्याचाराचे प्रतिक आहे. ही पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्य हे आमचे मुलभूत अधिकार सुरक्षित राहावेत, यासाठी मी या बेड्या घातल्या आहेत", अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली होती.