चितळे समितीचा मंत्र्यांवर ठपका!
By Admin | Updated: June 14, 2014 17:34 IST2014-06-14T04:34:15+5:302014-06-14T17:34:42+5:30
राज्यातील काही सिंचन प्रकल्पांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची बाब नियामक मंडळाच्या नजरेस आणूनसुद्धा वाढीव खर्चाला मंजुरी दिली

चितळे समितीचा मंत्र्यांवर ठपका!
मुंबई : राज्यातील काही सिंचन प्रकल्पांवर मंजुरीपेक्षा जास्त खर्च केला जात असल्याची बाब नियामक मंडळाच्या नजरेस आणूनसुद्धा वाढीव खर्चाला मंजुरी दिली गेली, अशा प्रकरणांमध्ये मंडळाचे तत्कालीन सदस्य आणि पदसिद्ध अध्यक्ष असलेले त्या-त्या वेळचे जलसंपदामंत्री जबाबदार असल्याचा ठपका सिंचन घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठेवला आहे. अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावरच हा ठपका आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी केला.
चितळे समितीचा अहवाल विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी मांडला जाणार आहे. मात्र, फडणवीस यांनी हा अहवाल फोडल्याचा दावा केला. फडणवीस म्हणतात त्यावर विश्वास ठेवला, तर युती काळातील महादेवराव शिवणकर आणि एकनाथ खडसे यांच्यावरही ठपका ठेवला आहे, असा अर्थ होत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याने केला. फडणवीस यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना चितळे समितीच्या अहवालाचा काही भाग फोडला. (विशेष प्रतिनिधी)