चिपळूण की राजापूर?

By Admin | Updated: February 20, 2015 21:17 IST2015-02-20T21:17:24+5:302015-02-20T21:17:24+5:30

कोकण किनारा-- कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे तो हा की, मार्ग चिपळुणातून कराडला जोडायचा की राजापुरातून कोल्हापूरला. या प्रस्तावावर विचार करताना भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे.

Chiplun Ki Rajapur? | चिपळूण की राजापूर?

चिपळूण की राजापूर?

को कण रेल्वे मार्ग कोल्हापूरशी जोडण्याची मागणी अनेक वर्षे सुरू होती. आता या मागणीला प्रस्तावाचे स्वरूप आले आहे. सर्वेक्षणाचा एक टप्पा पार पडला आहे. त्यामुळे कोकण आणि कोल्हापूर रेल्वेमार्गाने जोडले जाण्याची शक्यता नजीकच्या काळात प्रत्यक्षात येईल. पण, आता त्यात कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे तो हा की, मार्ग चिपळुणातून कराडला जोडायचा की राजापुरातून कोल्हापूरला. या प्रस्तावावर विचार करताना भावनेपेक्षा व्यवहाराला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. कारण एकदा एक ठिकाण निश्चित झाले आणि काम सुरू झाले की नंतर दुसरा मार्ग अस्तित्त्वात येण्यास बराच काळ जाईल. त्यामुळे चिपळूण की राजापूर हे निश्चित करताना अनेक अंगांनी विचार करावा लागेल. हा विचार करताना केवळ रत्नागिरी जिल्ह्याच्या बाजूने विचार न करता कोल्हापूरच्या बाजूनेही विचार व्हायला हवा. त्यातून अधिक फायदा असलेला मार्ग स्वीकारायला हवा. पश्चिम महाराष्ट्रातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांत भाजीपाला आणि दूध कोकणात येते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ होण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे आणि तो कुठूनही झाला तरी लवकरात लवकर व्हावा, यासाठी पाठपुरावा होणे गरजेचे आहे. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून ती पश्चिम महाराष्ट्राशी जोडली जावी, असा मुद्दा पुढे येत आहे. कोकण ही पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठी बाजारपेठ आहे. विशेषत: दूध आणि भाजीपाल्यासाठी कोकणाला पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून राहवे लागते. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांतील रेल्वेमार्गाची अपेक्षा पुढे आली. गेली अनेक वर्षे त्याबाबत वेगवेगळ्या स्तरावरून निवेदने देऊन झाली, मागण्या करून झाल्या. मात्र, फार मोठ्या हालचाली झाल्या नव्हत्या. चिपळूण, राजापूर आणि वैभववाडी अशा तीन ठिकाणांहून कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडता येऊ शकते. त्या-त्या भागांकडून आपापल्या मागण्यांचे समर्थन केले जाऊ लागले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर या प्रस्तावाला काहीशी गती आली. ते कराडचे असल्यामुळे तीन पर्यायांपैकी चिपळूण-कराड असा रेल्वेमार्ग करण्याला त्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे कोकण रेल्वेने प्राधान्याने या मार्गाच्या सर्वेक्षणावर भर दिला. हे सर्वेक्षण सुरू झाले, तेव्हा या मार्गाला अंतिम मंजुरी मिळाल्यासारखाच आनंद व्यक्त केला गेला. पण सर्वेक्षणानंतर या विषयाला काहीशी विश्रांती मिळाली. नंतर आधीचे राजापूरचे खासदार सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री झाले आणि पुन्हा एकदा कोकण-पश्चिम महाराष्ट्र मार्गाने उचल खाल्ली. प्रभू यांच्याकडे हे मंत्रीपद असल्यामुळे राजापूर-कोल्हापूर मार्गाचा प्रस्तावही चांगलाच चर्चेत आला आहे. सद्यस्थितीत कोकण-पश्चिम महाराष्ट्र मार्गासाठी तीन पर्याय आहेत. तीनही पर्यायांचे त्या-त्या भागातून समर्थन होत आहे. पण भावनेपेक्षाही व्यवहाराला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. कराडपेक्षा कोल्हापूरशी जोडले जाण्यात कोकणचा फायदा अधिक आहे. कोल्हापूरची बाजारपेठ मोठी आहे. भाजीपाला आणि दूध कोल्हापूरमधूनच कोकणात येते. त्यामुळे कराडपेक्षा कोल्हापूरला मार्ग कोकणसाठी हितावह आहे. कोल्हापूरला जोडले जाण्यासाठी राजापूर आणि वैभववाडी हे दोन्ही पर्याय चांगले आहेत. अर्थात राजापूर हा त्यातही मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे राजापूर-कोल्हापूर मार्ग अधिक फायदेशीर ठरू शकतो. या मार्गाचा विचार करताना केवळ कोकणातील प्रवाशांचा विचार करून चालणार नाही. कोल्हापूरच्या प्रवाशांचाही विचार करावा लागेल. कोल्हापूरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे दळवळणासाठी सुलभ व्हावेत, यासाठी राजापूरचा पर्यायच उपयोगी ठरणार आहे. केवळ हे दोनच जिल्हे नाहीत, तर कोल्हापूरसाठी गोवाही जवळचे ठरेल. पश्चिम महाराष्ट्राशी कोकणला जोडताना एक महत्त्वाचा विचार करावा लागेल, तो पर्यटन वाढीचा. पश्चिम महाराष्ट्रातून देवदर्शनासाठी कोकणात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना समुद्राचे आकर्षण आहे. त्यामुळे, हा मार्ग कोकणाला पर्यटक वाढवून देईल, हे निश्चित आहे. त्यामुळे चिपळूण-कराड असो किंवा राजापूर-कोल्हापूर असो. कुठलाही मार्ग झाला तरी चालेल, पण तो लवकरात लवकर होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी लोकप्रतिधींचा पाठपुरावा गरजेचा आहे. याआधी यांपैकी कोणत्याही मार्गाची मागणी झाली, ती लोकांनी केली होती, त्या मागणीवर पाठपुरावा करण्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने रस घेतलेला नाही. ना कुठल्या आमदाराने, ना कुठल्या खासदाराने. अर्थात राज्यस्तरावर सक्षम राजकीय नेतृत्त्व नाही, ही रत्नागिरी जिल्ह्याची खंतच आहे. कोकणातील राजकीय नेतेमंडळी एकमेकांना पाठबळ देण्याऐवजी एकमेकांचे पाय ओढण्यातच मग्न आहेत. त्यामुळे कोकणच्या आर्थिक विकसाला हातभार लावू शकणाऱ्या या मार्गाचा मुद्दा या लोकप्रतिनिधींनी कधीही पुढे आणलेला नाही. गोव्याची पूर्ण प्रगती केवळ पर्यटन उद्योगावर झाली आहे. कोकणचे निसर्गसौंदर्य त्याहून जराही कमी नाही. पण कोकणचे मार्केटींग झालेले नाही. गोव्यात आता गर्दी वाढत असल्याने गोव्याकडे जाणाऱ्यांची पावले कोकणात थबकू लागली आहेत. त्यामुळे सुट्ट्यांच्या काळात गोव्याप्रमाणेच कोकणही गर्दीने भरून जाऊ लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाकडे येण्यासाठी कमी वेळेचा पर्याय मिळाला, तर कोकणात येणाऱ्यांची संख्या वाढेल. हा विचार प्राधान्याने करायला हवा. पण स्वत:च्या ‘टर्म’पुरता विचार करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय लोकप्रतिनिधी पुढच्या दहा-पंधरा वर्षांमधील गरजांचा विचार करून नियोजन करू शकतील का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पर्यटन स्थळे हे कोकणचे बलस्थान आहे आणि त्या बलस्थानाकडे कोकणवासियांनीच पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यातल्या त्यात तारकर्ली (ता. मालवण) हा भाग अपवाद आहे. स्थानिक लोकांनी पर्यटन वाढीमध्ये अतिशय चांगला पुढाकार घेतला आहे. तिथे घरोघरी पर्यटकांची निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा पैसा स्थानिकांच्याच खिशात जातो. कोकणच्या इतर गावांनीही हा आदर्श समोर ठेवायला हवा. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा द्यायची असेल, तर रेल्वेचा अधिकाधिक फायदा करून घेण्यासाठी आपण पुढे असले पाहिजे. त्यासाठीच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना जोडणारा रेल्वेमार्ग होणे अतिशय गरजेचे झाले आहे. मनोज मुळ्ये

Web Title: Chiplun Ki Rajapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.