तांत्रिक अडचणींमुळे बंद असलेली सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाची सेवा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. खासदार नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाल्याचे मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे चिपी विमानतळ बंद होते. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन केंद्र सरकारने हे विमानतळ व्हायबिलिटी गॅप फंडिंग अंतर्गत सुरू करण्यास परवानगी दिली. यामुळे विमानतळावरील नाईट लँडिंगचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील, राज्यातील आणि परराज्यातील पर्यटकांना मोठा फायदा होईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत वेंगुर्ला-कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अनेक वर्षांपासूनचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला. हा प्रलंबित प्रश्न महायुती सरकारच्या काळात मार्गी लागल्याबद्दल मंत्री नितेश राणे यांनी समाधान व्यक्त केले. हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन तो मार्गी लावण्याचे श्रेय त्यांनी आमदार दीपक केसरकर यांना दिले, ज्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.