चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत २ जूनपासून प्रवेश सुरु
By Admin | Updated: May 29, 2014 00:11 IST2014-05-28T21:49:43+5:302014-05-29T00:11:13+5:30
ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत २ जूनपासून प्रवेश सुरु
मुंबई : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी २ जून ते २० जून २०१४ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पदवी परीक्षेची गुणपत्रिका (सर्वसाधारण वर्ग ५५टक्के व राखीव वर्ग ५० टक्के गुण आवश्यक), अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल सर्टिफिकेट), शाळा सोडल्याचा दाखला (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट), आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि स्टॅँम्प साईज छायाचित्रांच्या दोन प्रतींसह संस्थेकडील विहित नमुन्यात अर्ज करावा. टपालाद्वारे, कुरिअरद्वारे तसेच वेबसाईटवरुन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या मार्गदर्शन वर्गासाठीची प्रवेश परीक्षा २९ जून २०१४ रोजी सकाळी १०.३० ते १२ वेळेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथे होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर सामान्य अध्ययन या विषयाचीही परीक्षा असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार्या विद्यार्थ्यांची यादी १० जुलै २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर, १५,१६,१७ जुलै, २०१४ या तीन दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील.ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. लेखी चाचणी व मुलाखतीद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ सलग दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेस बसण्यासाठी हा प्रवेश असेल. कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारण्याचे अधिकार संस्थेस राहतील.
अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण, ति.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदान्त कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड वर्तकनगर ठाणे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत येऊन संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
..........................