चिमुकलीचे सिनेस्टाईल अपहरण पडले महागात

By Admin | Updated: November 21, 2014 00:52 IST2014-11-21T00:52:35+5:302014-11-21T00:52:35+5:30

ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून

Chimukuli cinestyle abduction falls in the price | चिमुकलीचे सिनेस्टाईल अपहरण पडले महागात

चिमुकलीचे सिनेस्टाईल अपहरण पडले महागात

दोघांना अटक : रायपूर रेल्वे स्थानकावरून मुलगी पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद विद्यालयात के.जी. वनमध्ये शिकत असलेल्या शिवानी गजबे या चार वर्षीय मुलीचे बुधवारी अपहरण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा अवघ्या काही तासात छडा लावून शिवानीला रायपूर (छत्तीसगड) रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले. मुलगी सुखरुप असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केली. याप्रकरणी त्यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेऊन माहिती दिली.
कबिंद्र लाजपतसिंग ठाकूर (२३) रा. ढकीया जि. रायपूर (छत्तीसगड) व अमित दिलीप थापा (२०) रा. तहेली, ता. जि. ओकरुर (मणिपूर) अशी अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत. १९ नोव्हेंबरला शाळा सुटल्यावर आरोपीने शिवानीचे अपहरण करुन खंडणीची मागणी केली होती. घाबरलेल्या आई-वडिलांनी ब्रह्मपुरी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली.
पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांनी मुलीच्या शोधासाठी एका विशेष पथकाला रवाना केले. मात्र शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून शिवानीच्या वडिलांचा व्यावसायिक भागिदार असलेल्या कबिंद्रला देसाईगंज येथे ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याने आपणच मुलीचे अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी दम दिल्यानंतर कबिंद्रने मोबाईलवरुन दुसरा आरोपी अमित याच्याशी संपर्क साधला. तेव्हा अमित हा मुलीला घेऊन गोंदियावरुन रेल्वेने रायपूरला निघाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तिकस यांच्या नेतृत्वात पोलीस पथक रायपूरला रवाना झाले. तेथे अमितला पकडून शिवानीला ताब्यात घेण्यात आले. पोलिस पथक शिवानीला घेऊन आज सकाळी ६ वाजता ब्रह्मपुरी येथे दाखल झाले. तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपी कबिंद्र ठाकूर व अमित थापा याच्यावर गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचा तपास ब्रह्मपुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
मुलीचा प्रवास ब्रह्मपुरी-देसाइगंज-गोंदिया-रायपूर
कबिंद्र हा मुलीच्या घरी नेहमी येत असल्याने त्याला ती ओळखत होती. त्यामुळे ती शाळा सुटल्यावर त्याच्यासोबत सहज गेली. कबिंद्रने तिचे अपहरण करुन देसाईगंज (गडचिरोली) येथे नेले. त्यानंतर त्याने आपला सहकारी अमित थापा याला बोलावून तिला त्याच्या ताब्यात दिले व १२. ४५ वाजता रेल्वेने दोघांनाही गोंदिया येथे रवाना केले. आपल्यावर कुणाचाही संशय येऊ नये, यासाठी कबिंद्र देसाईगंज येथे फिरत होता.

Web Title: Chimukuli cinestyle abduction falls in the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.