भावासाठी राखी आणणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडले
By Admin | Updated: August 17, 2016 21:18 IST2016-08-17T21:18:57+5:302016-08-17T21:18:57+5:30
राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षीय बालिकेला भरधाव कारने चिरडले.

भावासाठी राखी आणणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडले
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 17 - राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षीय बालिकेला भरधाव कारने चिरडले. या भीषण अपघातात तिचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी चिकलठाणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जालना रोडवर घडली.
अनुष्का भगवान दाभाडे (८, रा. शहानगर, चिकलठाणा) असे या बालिकेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहानगर येथील भगवान दाभाडे यांना आठ वर्षांची अनुष्का आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. १८ आॅगस्ट रोजी राखी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने पाच वर्षांच्या लहान भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी तिची आई, आजी आणि चुलता शांतीलाल दाभाडे हे अनुष्कासह बुधवारी दुपारी चिकलठाणा येथे आले होते. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जालना रोडवर असलेल्या सलीम कुरेशी यांच्या हॉटेलजवळ अनुष्का आईसह थांबली होती. तर तिची काकू, आजी आणि चुलता शांतीलालसह रस्ता ओलांडून राखीचे दुकान कोठे आहे हे पाहण्यासाठी गेले. त्याच वेळी अनुष्काही रस्त्याच्या शेजारी उभी असतानाच धूत हॉस्पिटलकडून जालन्याकडे वेगाने जाणाऱ्या कारने तिला चिरडले. त्यानंतर तिला उडविणारा कारचालक घटनास्थळी न थांबता सुसाट वेगाने निघून गेला. हा अपघात एवढा भीषण होता की, अनुष्काच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रस्ता ओलांडून खरेदीसाठी गेलेले शांतीलाल दाभाडे आणि अन्य नातेवाईकही धावले. तेव्हा आपल्याच अनुष्काला वाहनाने उडविल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास अनुष्काची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चिमुकल्या भावाला राखी बांधण्याची इच्छा अपुरीच राहिली
राखी पौर्णिमेच्या दिवशी लहान भावाला आपल्या आवडीची राखी बांधायची तिची इच्छा होती. त्यामुळे ती हौशीने राखी खरेदीसाठी आई आणि अन्य नातेवाईकांसोबत चिकलठाणा येथे गेली होती. काळाने तिच्यावर घाला घातल्याने चिमुकल्या भावाला राखी बांधण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली. या घटनेने दाभाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.