मुलांचे भावविश्व बदलले !
By Admin | Updated: November 13, 2016 19:56 IST2016-11-13T19:56:00+5:302016-11-13T19:56:00+5:30
भौतिक सुख-सुविधांच्या उपलब्धतेमुळे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे भावविश्व बदलत चालले आहे.

मुलांचे भावविश्व बदलले !
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 13 - भौतिक सुख-सुविधांच्या उपलब्धतेमुळे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे भावविश्व बदलत चालले आहे. ज्या वयात त्यांची पावले मैदानी खेळांकडे वळावयास हवी, त्या वयात ही अबोध बालके इंटरनेट आणि टीव्हीच्या मोहपाशात अडकत चालली आहेत. घर ते शाळा आणि शाळा ते घर अशा रोजच्या प्रवासात अवांतर वाचनाकडे दुर्लक्ष होत असतानासुद्धा ही बालके डॉक्टर, इंजिनिअर आणि पायलट होण्याची स्वप्ने उरी बाळगून असल्याचे चित्र लोकमतने रविवारी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
वेस्टर्न कल्चर अर्थात पाश्चिमात्य संस्कृतीचे आकर्षण अलीकडे जरा जास्तच वाढले आहे. त्यातच लहान कुटुंब. त्यामुळे पाळणाघरातच मुले मोठी होतात. पालक १२ तास कामावर असतात. त्यामुळे पाल्य आणि पालक असा संवाद फार कमी झालाय. त्यातच मोबाइल, लॅपटॉप व इंटरनेट सोबतीला आहेच. नको त्या संगतीचाही परिणाम पाल्याचा वर्तणुकीवर होत असतो आणि पिढीतील विचारातील अंतर याचाही परिणाम दिसून येतो. अकोलेकरांचे राहणीमानसुद्धा दिवसागणिक बदलत चालले असल्याने येथील १२ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांचे भावविश्व प्रकर्षाने बदलत चालले असल्याचे चित्र रविवारी सर्वेक्षणादरम्यान आढळून आले. तुम्हाला घरी कुणी रागवतं का, या प्रश्नाला उत्तर देताना बहुतांश मुलांनी त्यांचे पालकच त्यांच्या वेळेत घरी उपस्थित राहत नसल्याची बाब स्पष्ट केली. ह्यधाक बडी चीज होती हैह्ण असे म्हणतात; मात्र कामकाजानिमित्त बाहेर राहणार्या पालकांच्या अनुपस्थितीत ही बालके कुणाचाही धाक नसल्याने मायाजालाच्या मोहपाशात गुरफटत चालली असल्याचे स्पष्ट झाले. शाळेव्यतिरिक्त सर्वाधिक वेळ घरी घालविणारी ही बालके इंटरनेटच्या मायाजालात प्रचंड गुरफटत चालली असून, सोशल मीडियाचा वापर करताना नकळतपणे सायबर गुन्हेगारीला आव्हान देत आहेत. शाळा, कोचिंग क्लास आणि घर या प्रवासात ही बालके अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनास कमी महत्त्व देत असल्याचे स्पष्ट होत आहे. टीव्हीवरील काटरून चॅनल्स, विविध प्रकारचे गेम्स चॅनल, वर्षानुवर्षे अविरत चालणार्या विविध मालिका आणि सेन्सॉर बोर्डाची कात्री न लागलेल्या चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेणारी ही अबोध बालके, भविष्यात मात्र डॉक्टर, इंजिनिअर, पायलट, रेल्वे इंजिनिअर, वकील, शिक्षक, उद्योजक आणि कला व क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवू इच्छित असल्याची बाब या सर्वेक्षणातून प्रकर्षाने समोर आली. सर्वेक्षणादरम्यान बालकांनी दिलेल्या उत्तरांच्या टक्केवारीवरून त्यांचे भावविश्व प्रकर्षाने बदलले असल्याचे स्पष्ट झाले.