चिल्ड्रन होम विलीनीकरण रखडले
By Admin | Updated: October 20, 2016 05:53 IST2016-10-20T05:53:35+5:302016-10-20T05:53:35+5:30
शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दीड महिन्यांत मानखुर्द बालसुधारगृहात सहा बालकांचा मृत्यू झाला आहे.

चिल्ड्रन होम विलीनीकरण रखडले
समीर कर्णुक,
मुंबई- शासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या दीड महिन्यांत मानखुर्द बालसुधारगृहात सहा बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मानखुर्द बालसुधारगृह सध्या चर्चेत आले आहे. चिल्ड्रन होम या संस्थेचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी गेल्या वर्षांपासून होत आहे. मात्र मंत्र्यांच्या आदेशानंतरही शासकीय अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रस्ताव अद्यापही धुळखात पडून आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचारी वर्ग करत आहे.
समाजातील अनाथ, वंचित, गतीमंत आणि आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांसाठी मुंबईत आठ बालसुधारगृह आहेत. ‘द चिल्ड्रेन्स एन्ड सोसायटी’ या बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेकडे या संपूर्ण सुधारगृहांचा कारभार आहे. राज्याचे गृहमंत्री या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्षपद महिला व बालविकासमंत्री यांच्याकडे आहे. मात्र या नेत्यांना या बालसुधारगृहांकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या सुधारगृहांची मोठी दुरावस्था आहे. मुलांना राहण्यासाठी योग्य जागा नाही, पौष्टीक अन्न नाही, कपडे नाहीत, पिण्यासाठी योग्य पाणी नाही अशा अनेक समस्या मुलांना भेडसावत आहेत. परिणामी येथील कर्मचाऱ्यांना बाहेरुन देणगीदार शोधावे लागत आहेत. त्यामुळे या संस्थेचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील कर्मचारी करत आहेत. त्याुनसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत काही महिन्यांपूर्वींच संस्था विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र शासकीय अधिकाऱ्यांनी अद्यापही पावले उचललेली नसल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
>‘सचिव मिटिंगमध्ये व्यस्त’
या प्रकरणी महिला व बालविकास प्रधान सचिव संजय कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे कारण सांगून या विषयावर बोलण्यास नकार दिला.