बालकल्याण सभापतीपद मनसेला
By Admin | Updated: January 30, 2015 04:05 IST2015-01-30T04:05:01+5:302015-01-30T04:05:01+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापतीपदी मनसेच्या कोमल पाटील यांची बिनविरोध निवड झाली

बालकल्याण सभापतीपद मनसेला
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महिला बालकल्याण समिती सभापतीपदी मनसेच्या कोमल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली होती. गुरुवारी पीठासीन अधिकारी असलेल्या ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी पाटील यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब केले.
डिसेंबरमध्ये झालेल्या निवडीत शिवसेनेच्या रेखा जाधव, प्रतिमा जाधव, लीला तरे, शोभा पावशे (शिवसेना), उपेक्षा भोईर (भाजपा), लक्ष्मी बोरकर, भारती कुमरे, कोमल पाटील (मनसे), शर्मिला पंडित (काँग्रेस), दर्शना म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि उषा वाळंज आदी ११ सदस्यांची समितीवर नियुक्ती झाली होती. आतापर्यंत सभापतीपद शिवसेना-मनसेने आलटूनपालटून घेतले आहे. मागील वेळी पद मनसेकडे होते़ यंदा शिवसेनेच्या सदस्याची या पदावर नियुक्ती होण्याची चिन्हे होती. परंतु, आगामी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पाहता ‘स्टँडिंगच्या अंडरस्टँडिंग’मध्ये पुन्हा हे पद मनसेला बहाल केल्याची चर्चा आहे. अपुरे प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला मानस असून बालवाडी शाळांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.