अनैतिक संबंधातून मालाडमध्ये आईनेच घडवली मुलाची हत्या ?
By Admin | Updated: December 11, 2015 18:43 IST2015-12-11T18:13:37+5:302015-12-11T18:43:39+5:30
मालाडमधल्या ३३ वर्षाच्या युवकाच्या हत्येचे गूढ उकलले असून, अनैतिक संबंधातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

अनैतिक संबंधातून मालाडमध्ये आईनेच घडवली मुलाची हत्या ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - तीन दिवसांपूर्वी मालाडमध्ये घडलेल्या रोनाल्ड डिसोझा हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात बांगूरनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी रोनाल्डची आई सिसिलिया डिसोझाला (५४) अटक केली आहे. पोलिसांनी हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केले नसले तरी,अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सिसिलियाचे तिच्या वाहन चालकासोबत अनैतिक संबंध असल्याचे बोलले जाते. त्याला रोनाल्डचा विरोध होता. त्यातूनच ही हत्या घडवण्यात आली.
मंगळवारी रात्री सिसिलिया पाय मोकळे करण्यासाठी म्हणून घराबाहेर पडली होती. तेवढया वेळात अज्ञात मारेक-यांनी रोनाल्डची भोसकून हत्या केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांचा सिसिलियावरील संशय बळावला. सिसिलिया जी माहिती देत होती त्यातही विसंगती आढळल्याने पोलिसांनी दोन दिवस तिची कसून चौकशी केली आणि अखेर तिला अटक केली.
रोनाल्ड परदेशात नोकरीला होता. तो सुट्टीवर घरी परतला होता. ख्रिसमस आधी तो पुन्हा कामावर जाणार होता मात्र त्याआधीच त्याची निर्घुण हत्या केली. रोनाल्डचे मारेकरी अद्यापही फरार आहेत.